Maharashtra Kesari 2023 : पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती गटातील अंतिम लढतीत पैलवान सिकंदर शेख (Sikandar shaikh) याच्यावर अन्याय झाल्याचा जाब विचारल्या प्रकरणी मुंबई पोलिस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांच्या विरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आलीय. परंतु, संग्राम कांबळे यांनी कोणालाही धमकी दिली नाही असं पैरवान सिकंदर शेख याने म्हटले आहे. शिवाय माझ्यावर झालेला अन्याय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय, असं सिकंदर शेख याने म्हटलंय. या संपूर्ण प्रकरणावर सिंकदर शेख याने एबीपी माझासोबत संवाद साधलाय.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान सिकंदर शेख विरोधात चार गुण दिल्याने पंच मारूती सातव यांना धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. मुंबई पोलिस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांनी फोनवरून धमकी दिल्याची तक्रार पंच मारूती सातव यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समिती अध्यक्षांकडे केली असून त्यांच्या तक्रारीनंतर समितीने पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात संग्राम कांबळे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलिस शिपाई कांबळे आणि पंच सातव यांच्यातील फोन रेकॉर्डिग सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या तक्रारीनंतर संग्राम कांबळे यांनी कोणालाही धमकी दिली नसल्याचे पैलवान सिकंदर शेख याने म्हटलं आहे.
"संग्राम कांबळे यांनी कोणालाही धमकी दिली नाही. त्यांनी फक्त हे योग्य झालं का असा प्रश्न विचारला आहे. माझ्यावर अन्याय झाला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय. पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापुरात आणणार. टांग मारताना ज्या नियमाने गुण द्यायला पाहिजे तसं झालं नाही. व्हिडीओ सर्व बाजुंनी पाहू दिला नाही. कोच यांनी दाद मागितली पण त्यांना देखील काही बोलू दिलं नाही. जिथ टांग लागली आहे तिथं पूर्णपणे टांग बसलेली नाही. पूर्ण पाठीवर न पडता मी एका खांद्यावर पडलोय. त्यामुळे महेंद्र गायकवाडची अॅक्शन होती म्हणून त्याला दोन गुण देणं अपेक्षित होतं आणि माझा कब्जा आहे म्हणून मला एक गुण देणं अपेक्षित होतं. परंतु, असं न होता पंचांनी महेंद्रला चार गुण दिले. त्यावेळी माझ्या कोच यांनी दाद मागितली. परंतु, त्यांना काही न बोलू देता तेथून परत पाठवलं. चॅलेंज सक्सेस झालं असं माझ्या कोचला सांगितलं. परंतु, चॅलेंज सक्सेस झालं असं सांगितलं जात असेल तर मग महेंद्रला चार गुण कसे दिले? शिवाय फक्त समोरचाच व्हिडीओ का दाखवला? मागील कॅमेऱ्याचा व्हिडीओ का दाखवला नाही. मी तशी मागणी देखील केली होती, असे सिकंदरने सांगितलं.
माझ्यावरील अन्याय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापुरात आणणार. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आमच्या तालमीतीलच पैलवानांची आपापसात लढत झाली. त्यामुळे सुरूवातीपासूनच काही पैलवान बाहेर पडले. त्यानंतर सर्वांना वाटत होते की मी महाराष्ट्र केसरी होणार. परंतु, तसं झालं नाही याचं दु:ख आहे. पंचांनी योग्य निर्णय घेतला पाहिजे होता, असं सिकंदर याने म्हटलं आहे.
सिकंदरने सांगितलं योग्य टांग म्हणजे काय?
चार गुण पाहिजे असतील तर समोरचा पैलवान पूर्णपणे पाठीवर पडला पोहिजे. किंवा पैलवान पूर्णपणे वरून खाली पडला पाहिजे. त्यावेळी चार गुणांची अॅक्शन होते. यात पूर्णपणे माझा कब्जा असून त्याला चार गुण देणं चुकीचं झालं आहे.
महत्वाच्या बातम्या