Marathwada Teacher Constituency Election: विधान परिषदेच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून छाननीत हे सर्व अर्ज वैध ठरले आहेत. तर आज उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे 15 पैकी नेमके किती उमेदवार निवडणूक रिंगणात असतील, हे दुपारी तीन वाजेनंतर स्पष्ट होणार आहे.
मराठवाडा विभाग शिक्षक मतदारसंघासाठी 12 जानेवारीपर्यंत 15 उमेदवारांनी 30 अर्ज दाखल केले आहेत. यात राष्ट्रवादीकडून विक्रम काळे, भाजपचे किरण पाटील, वंचितचे कालिदास माने, अपक्ष उमेदवार अनिकेत वाघचवरे, अश्विनीकुमार क्षीरसागर, आशिष देशमुख, कादरी शाहेद अब्दुल गफार गणेश शेटकर, नितीन कुलकर्णी, प्रदीप साळुंके, मनोज पाटील, विशाल नांदरकर, सूर्यकांत विश्वासराव, संजय तायडे, ज्ञानोबा डुकरे यांचा समावेश आहे. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज कोण मागे घेणार, याकडे शिक्षक मतदार संघातील मतदारांचे लक्ष लागले आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत ही प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर शिल्लक उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित केली जाणार आहे. मराठवाड्यात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 61 हजार 529 मतदार आहेत. तर 222 मुळ आणि 5 सहायकारी असे एकूण 227 मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज आहे.
खरी लढत राष्ट्रवादी-भाजपमध्ये?
मराठवाडा शिक्षक मतदारसंघात एकूण 15 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र यातील काही उमेदवारी अर्ज आज परत घेण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात खरी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीकडून विक्रम काळे आणि भाजपकडून किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असून, दोन्ही उमेदवार आपणच जिंकणार असल्याचा दावा करत आहे.
मतदार आणि केंद्रसंख्या
जिल्हा | मतदार संख्या | केंद्रसंख्या |
औरंगाबाद | 13924 | 53 |
जालना | 5037 | 15 |
परभणी | 4472 | 18 |
हिंगोली | 3060 | 12 |
नांदेड | 8821 | 30 |
बीड | 9769 | 34 |
लातूर | 11264 | 40 |
उस्मानाबाद | 5182 | 25 |