Maharashtra Karnataka Border Dispute: बेळगाव सीमावादावरुन (Belgaum Border) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेला 48 तासांचा अल्टिमेटम आज संपलाय. आज दुपारी 1 वाजता शरद पवारांची पत्रकार परिषद होणार आहे. कन्नड रक्षण वेदिके (Kannada Rakshana Vedike) या संघटनेकडून महाराष्ट्राच्या बसेसवर दगडफेक केल्यानंतर राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यावर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत 24 तासांत हल्ले थांबवा अन्यथा, पुढच्या 48 तासांत माझ्यासह महाराष्ट्रातील सर्व खासदारांना बेळगावच्या नागरिकांना धीर देण्यासाठी जावं लागेल, असा इशारा पवारांनी दिला होता. त्यामुळे आता शरद पवार पत्रकार परिषदेत काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnatak Border) पुन्हा उफाळून आला. त्यानंतर राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया समोर येत होत्या. अशातच कन्नड रक्षण वेदिके (Kannada Rakshana Vedike) या संघटनेकडून महाराष्ट्राच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली. यावरुन विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही पत्रकार परिषद घेत कर्नाटकला इशारा दिला होता. पुढच्या 48 तासांत हल्ले थांबवा नाहीतर  पुढच्या 48 तासात माझ्यासह महाराष्ट्रातील सर्व खासदारांना बेळगावच्या नागरिकांना धीर देण्यासाठी जावं लागेल, असं म्हणत पवारांनी कर्नाटकला इशारा दिला होता. आज सकाळी 10.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला आहे. त्यानंतर शरद पवारांची दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत शरद पवार आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. 


काय म्हणाले होते शरद पवार? 


शरद पवार म्हणाले होते की, "या विषयात राज्य सरकारने भूमिका घेणे गरजेचे होत मात्र ती घेतली जात नाही. आज हल्ले झाले त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. येत्या 24 तासात वाहनावरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल आणि जे होईल त्याला कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री जबाबदार असतील." पुढे बोलताना पवार म्हणाले होते की, "देशाच्या ऐक्याला धक्का देण्याचं काम केलं जात आहे. उद्यापासून संसदीय अधिवेशन सुरू होतं आहे. मी खासदारांना विनंती करणार आहे की त्यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घ्यावी. तरी देखील भूमिका घेतली गेली नाही तर आम्हाला भूमिका घ्यावी लागणार आहे." 


"माझ्यासह सर्वांना बेळगाववासियांना दिलासा देण्यासाठी बेळगावला जावं लागेल. संयम ठेवूनदेखील जर हालचाल होतं नसेल तर आम्हाला बेळगाववासियांना दिलासा द्यावा लागेल यासाठी भूमिका घ्यावी लागेल.", असंही शरद पवार म्हणाले होते.