नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी पडसाद उमटण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार सभागृहात याप्रश्नी आवाज उठवण्याची शक्यता आहे. त्याचवेळी शिंदे गटाचे खासदारही या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याच्या तयारीत आहेत. 


महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्यानंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी या प्रश्नी केंद्रीय मंत्र्याची भेट घ्यावी असं आवाहन केलं होतं. तर ठाकरे गटाच्या खासदारांनी यावर संसदेत आवाज उठवण्याची तयारी सुरू केली आहे.  


बुधवारपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याचवेळी महाराष्ट्र आणि कर्नाटचा सीमाप्रश्न पुन्हा एकदा तापल्याचं चित्र आहे. शिंदे गटाचे खासदार या प्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार हे या प्रश्नी आक्रमक आहेत. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते कर्नाटकच्या दडपशाहीविरोधात आवाज उठवण्याच्या तयारीत आहेत.  


बेळगावजवळ महाराष्ट्राच्या गाड्यांवर दगडफेक 


महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगलीतील काही गावांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानंतर सीमाप्रश्न पुन्हा एकदा तापल्याचं चित्र आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या नेत्यांनी यावर आक्रमक भूमिका घेत कर्नाटकचा निषेध केला. आता कर्नाटकच्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या जवळ महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. कन्नड संघटनांच्या या कृत्यामुळे आता महाराष्ट्रात संतापाची लाट उमटल्याचं चित्र आहे.


दरम्यान कन्नड संघटनांच्या या कृत्यामुळे कोल्हापुरात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या वतीने कोगनोळी टोलनाक्याजवळ आंदोलन करण्यात येत आहे. 


सीमाप्रश्नी कर्नाटकच्या आततायी भूमिकेवर महाराष्ट्रात संतापाची लाट उठल्याचं दिसत आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रियाल दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात सध्याचं सरकार हे लाचार सरकार आहे. या सरकारला पाय नसून खोके आहेत. मुख्यमंत्री ज्या खुर्चीवर बसलेत त्या खुर्चीवरुन महाराष्ट्राचा अपमान केला जात आहे. महाराष्ट्र पेटला तर सरकारला ते भारी पडेल. 


दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सीमा भागातील परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष दयावे. परिस्थिती लवकर सुधारली नाही तर पवार साहेब पोहचण्याआधी राष्ट्रवादी युवक काँग्रेस गनिमीकाव्याने बेळगावच्या स्थानिक मराठी भाषिक लोकांना साथ देण्यासाठी तिथे जाणार."