Devendra Fadnavis Calls Karnataka CM : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील (Maharashtra-Karnataka Border Dispute ) बेळगावमधल्या (Belgaon) हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेकीमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना फोन केला. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोलनाक्याजवळ झालेल्या घटनेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात नाराजी आणि निषेध नोंदवण्यात आला.


हिरेबागवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक
कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली. हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे मिरवले. त्याशिवाय, महाराष्ट्राच्या ट्रकला शाईदेखील फासण्यात आली आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. कन्नड संघटनांच्या या दगडफेकीनंतर कर्नाटक सरकारने कारवाई करावी अशी मागणी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी केली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन निषेध व्यक्त केला.


दोषींवर कठोर कारवाई करु, महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण देऊ : कर्नाटकचे मुख्यमंत्री
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण झालं. यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं. तसंच महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असंही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केलं आहे.


महाराष्ट्रातील नेत्यांकडून घटनेचा निषेध
दरम्यान हिरेबागवाडी टोलनाक्यावरील घटनेचा राज्यातील मंत्र्यांसह विविध पक्षांच्या नेत्यांनी निषेध केल आहे. कर्नाटक सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावे अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबाबत बोलतील असंही त्यांनी म्हटलं. तर शंभूराज देसाई यांनी या दगडफेकीच्या घटनेचा निषेध केला. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दौरा पुढे ढकलला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी असंही त्यांनी म्हटले. कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांसोबत आपण चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले. दुसरीकडे ठाकरे गटाने राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. मिंदे सरकारमुळे राज्याच्या अस्मितेवर घाला घालण्याचे काम सुरू आहे. राज्यातील सरकार दिल्लीसमोर गुडघे टेकत असल्याने हे प्रकार घडत असल्याचा आरोप सावंत यांनी केला. कर्नाटकमधून अशा घटना समोर येत असतील तर त्याला प्रत्युत्तर दिले गेल्यास काय होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 


संबंधित बातमी


बेळगाव सीमाभागात कन्नड संघटनांचा उच्छाद, महाराष्ट्राच्या 6 ट्रकवर दगडफेक; राज्यात संतापाची लाट