Jalgaon Crime News : जळगावात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एरंडोल तालुक्यातील खडकीसिम शेतशिवारातील गांजाची शेती स्थानिक पोलिसांनी उधळून लावली आहे. यावेळी पोलिसांनी तब्बल 61 लाख 25 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime News)



पोलिसांना मिळाली होती गोपनीय माहिती


या प्रकरणी एरंडोल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील खडकीसिम येथील दिगंबर पंडित पाटील यांच्या शेतात आणि नितीन डिगंबर पाटील यांच्या तूर पिकाच्या शेतामध्ये गांजा या मादक पदार्थाची लागवड केली जात असल्याची गोपनीय माहिती एरंडोल पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, विलास पाटील, राजेंद्र पाटील, अकिल मुजावर, मिलिंद कुमावत, संदीप पाटील, जुबेर खाटीक, पोलीस हवालदार पंकज पाटील, चालक हेमंत घोंगडे, होमगार्ड दिनेश पाटील यांच्यासह आदींनी शुक्रवार 4 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये 11 एकर क्षेत्रात 875 किलो गांजा आढळून आला. याचा शेतमालक हे गुजरात मध्ये राहत असून त्यांनी सदरचे शेत हे मेरसिंह खरटे यास कसण्यासाठी दिल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी दिली. संशयित मेरसिंह खरटे यास पोलिसांची कुणकुण लागतात तो पसार झाला. शेतात गांज्याची लागवड केल्याची माहिती पोलिसांना गुरुवारी सायंकाळी मिळाली होती. मात्र अंधार पडल्यामुळे शेतात काही दिसत नसल्यामुळे रात्रभर शेतात पोलिसांचा बंदोबस्त ठेवून आज सकाळी पंचनामा करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या शेताला चारही बाजूने तारेचे कुंपण करण्यात आलेले आहे. सदरच्या शेतात तीन ते चार वर्षांपासून  गांजासारख्या अमली पदार्थाची लागवड करण्यात येत असल्याची चर्चा परिसरातील शेतकऱ्यांमधील सुरू होती. 


दोन संशयित आरोपी शेतातून पसार  
दोन्ही शेतातून 61 लाख 25 हजार रुपये किंमतीचा 875 किलो गांजा तसेच 70 हजार रुपये किंमतीची दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली असल्याचे समजते. दरम्यान, दोन संशयित आरोपी हे शेतातून पसार झाले असल्याचे कळते. तर याबाबत पोलीस हवालदार विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


पुण्यात परप्रांतीय प्रेयसी बेपत्ता, पत्रकार प्रियकर चौकशीसाठी ताब्यात