जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात पाच हजारच्या जवळपास कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर यामध्ये 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा कहर काही केल्या थांबत नसल्याचे चित्र जळगावात दिसत आहे. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह जिल्ह्यातील अनेक शासकीय रुग्णालयातील अनेक डॉक्टर्स आणि कर्मचारी देखील कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखीनच भर पडल्याचं चित्र आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शासकीय तसेच खासगी दवाखाने फुल झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असतानाच अनेक डॉक्टर्स आणि कर्मचारी देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले असल्याने उर्वरित कर्मचारी आणि डॉक्टर्स यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे. मागील पाच दिवसांचा जिल्ह्यातील रुग्ण संख्येचा विचार केला तर 4893 इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर पाच दिवसात 29 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. जळगाव जिल्ह्याचा आजपर्यंतचा विचार केला तर आतापर्यंत 71,619 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर त्यातील 62,318 रुग्ण बरे होऊन परतले आहेत. तर आतापर्यंत 1449 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने त्यावर नियंत्रण म्हणून जिल्हा प्रशासनाने बाधित रुग्णांवर उपचारासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सोई सुविधा जिल्हाभरात उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. त्यासाठी सर्व ठिकाणी बेडची संख्या वाढवण्यात येत आहे. या शिवाय शासकीय महाविद्यालयात डॉक्टर्स आणि कर्मचारी यांना कोरोनाची बाधा झालेली असली तरी, सध्या असलेल्या रुग्ण संख्येचा विचार करता पुरेसा डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे. त्यात बाधित डॉक्टर्स आणि कर्मचारी हे लवकरच पुन्हा आपल्या कामावर हजर होणार असल्याने रुग्णांची गैरसोय होणार नाही याची प्रशासन काळजी घेत आहे. मात्र रुग्णसंख्या जास्त प्रमाणात वाढत आहे आणि अजून डॉक्टर्स आणि कर्मचारी यांची आवश्यकता भासत असेल तर बाहेरच्या जिल्ह्यातून गरज पूर्ण केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यांनी दिली आहे.
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात- केंद्रीय आरोग्य मंत्रालय