INDIA Alliance: लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) प्रत्येक पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजपला (BJP) टक्कर देण्यासाठी देशभरातील सर्व विरोधकांनी मूठ बांधली आहे. विरोधकांकडून प्रत्येक राज्यात चाचपणी अन् जागावाटपावर चर्चा सुरु आहे. लोकसभासाठी महत्वाचं असलेल्या महाराष्ट्रातही (Maharashtra) जागावाटपाची चर्चा रंगली आहे. नवी दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपाची आज चर्चा रंगणार आहे. वंचितच्या समावेशाबद्दलही अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्रात कोणता पक्ष किती जागा लढवणार? याची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि वचिंत या चार पक्षांमध्ये 48 जागां लढवल्या जाणार आहेत. 


महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील जागावाटपाचे अनेक फॉर्मुले सध्या समोर येत आहेत. सध्या दोन फॉर्मुले समोर आले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना सर्वाधिक जागा लढवण्याची शक्यता आहे. 


फॉर्मुला पहिला - 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट सर्वाधिक जागांवर निवडणुका लढवण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूजने दिलेल्या फॉर्मुल्यानुसार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस 18 ते 20 जागांवर निवडणूका लढवू शकते. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 6 ते 8 जागा लढवण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे.  


फॉर्मुला दुसरा - 


दुसऱ्या फॉर्मुलानुसार, शिवसेनेला 17 ते 19 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेने लोकसभेसाठी 23 जागांची मागणी केली आहे. शिवसेना एकसंध असताना त्यांनी 23 जागांवर निवडणूक लढवली होती, त्यांना 18 जागांवर यश मिळाले होते. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट 23 जागांसाठी अग्रही आहे. पण सुत्रांच्या माहितीनुसार त्यांना 17 ते 19 जागा मिळू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 13 ते 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाने 18 जागांची मागणी केली होती. तर काँग्रेसला 12 ते 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसनेही 18 जागांची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील 2-3 जागा प्रकाश आंबेडकर आणि शेतकरी संघटनेला मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे . 


कोणत्या आधारावर जागावाटप ?


सुत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या हिंदू राष्ट्रवादाला काऊंटर करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जास्त महत्व मिळण्याची शक्यता आहे. याला काँग्रेसच्या हायकमांडकडूनही सकारात्मक प्रतिसात मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही शिवसेनेची ताकद कायम असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. दुसरीकडे अजित पवार वेगळे झाल्यानंतर शरद पवारांसोबत जास्त नेते राहिले नाहीत, त्यासाठी राष्ट्रवादीला कमी जागांवर समाधान मानावे लागेल. दलित मतांना एकजूट ठेवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला दोन जागा दिल्या जाऊ शकतात. 


मागील निवडणुकीत या पक्षांचं प्रदर्शन कसं होतं ? 


लोकसभा 2019 मध्ये महाराष्ट्रात भाजपा सर्वात मोठा पक्ष राहिला होता. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत निवडणूक लढवली होती.भाजपला 23 जागांवर विजय मिळवला होता. तर शिवसेनेने 23 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या. पण आता शिवसेनेतील अंतर्गत कलह झालाय. 


महाराष्ट्रात काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला होता. तर एनसीपीला चार जागा मिळाल्या होत्या. वचिंत बहुजन पक्षाला एकही जागा जिंकता आली नव्हती.