मुंबई: इंडिया आघाडीच्या राज्यातील लोकसभा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या जागा वाटपामध्ये निर्णय होण्याआधीच शिवसेना ठाकरे गटाने राज्यातील 48 पैकी 23 जागांवर लढण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. या जागा लढण्यावर शिवसेना ठाकरे गट ठाम आहे. तर हाच ठाकरे गटाचा प्रस्ताव राज्यातील काँग्रेस नेत्यांनी एक प्रकारे धुडकावून लावला आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने समसमान चार पक्षांनी 12-12 जागा लढवाव्यात असा फॉर्मुला समोर ठेवला आहे. त्यामुळे तिढा सुटण्याऐवजी हा तिढा रोज नेत्यांकडून येणाऱ्या राजकीय प्रतिक्रियांमुळे आणि दाव्यामुळे वाढत असल्याचे दिसतंय. त्यामुळे जागा वाटपावर शिक्कामोर्तब कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.


आम्ही 23 जागांवर लढणार, त्यावर आम्ही ठाम आहोत. आधीच्या जिंकलेल्या 18 जागांवर तर चर्चा होणार नाही असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. वंचितने 12 जागांची मागणी केलीय. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. 


काँग्रेसच्य वरिष्ठ नेत्यांची बैठक


या सगळ्या राजकीय प्रतिक्रिया पाहून राज्यातील लोकसभा जागा वाटपाचा इंडिया आघाडीतील तिढा सुटण्याऐवजी तो वाढत चालल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसात जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात आल्याचं इंडिया आघाडीतील राज्यातील नेत्यांनी सांगितलं. मात्र या प्रतिक्रियेमुळे या जागा वाटपावर पुन्हा बसून चर्चा करण्याची वेळ इंडिया आघाडीवर आली आहे आणि त्यामुळेच दिल्लीत काँग्रेसने वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली.


इकडे दिल्लीत काँग्रेसची बैठक जरी होत असली तरी शिवसेना ठाकरे गट आपल्या 23 जागा आणून कमी जागा लढवण्यास तयार नाही. मागच्या लोकसभेत शिवसेनेने ज्या जागा लढवल्या त्या जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार यावर पक्ष ठाम आहे. सोबतच ज्या 18 जागा शिवसेनेने जिंकल्या त्यावर कुठलीही चर्चा होणार नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. मागील इंडिया आघाडीच्या बैठकी दरम्यान ठाकरे गटाकडून राज्यातील ज्या 23 लोकसभा शिवसेना ठाकरे गट लढवणार ठाम आहे त्या जागांची यादी वरिष्ठ नेत्यांसमोर ठेवली असल्याची माहिती आहे.


यामध्ये अशा कोणत्या 23 जागा आहेत ज्यावर शिवसेना ठाकरे गट लोकसभा निवडणूक लढवणार ठाम आहे त्या पाहूयात, 


1) रामटेक 


2)बुलढाणा 


3) यवतमाळ वाशीम 


4)हिंगोली 


5) परभणी 


6) जालना


7) संभाजीनगर 


8) नाशिक


9)पालघर 


10) कल्याण 


11) ठाणे


12) मुंबई उत्तर पश्चिम


13)मुंबई दक्षिण


14) मुंबई ईशान्य 


15) मुंबई दक्षिण मध्य


16) रायगड 


17)रत्नागिरी सिंधुदुर्ग


18) मावळ


19) शिर्डी


20) धाराशिव


21) कोल्हापूर 


22) हातकणंगले - (स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडू शकतात)


23) अकोला - (वंचित बहुजन आघाडीसाठी सोडू शकतात) 


सेना आपली ताकद असलेल्या अमरावतीची जागा सोडून अकोला जागा वंचितला देणार असल्याची माहिती आहे. तर शिरूरची जागा राष्ट्रवादीसाठी सोडून ईशान्य मुंबईच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे. जागावाटपाच्या अंतिम चर्चेमध्ये काही जागांवर फेरफार होऊ शकतो, मात्र या 23 जागांवर ठाकरे गट ठाम असल्याची नेत्यांची माहिती आहे.


शिवसेनेच्या ज्या 23 जागांवर दावा केला जातोय त्यामध्ये एक जागा वंचित बहुजन आघाडीसाठी आणि एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी शिवसेनेने आपल्या कोट्यातून सोडली असल्याची माहिती आहे. मात्र यामध्ये वंचित बहुजन आघाडीने एक नाही तर बारा जागांवर लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे.त्यामुळे वंचितला सोबत घेताना या प्रस्तावाचा विचार इंडिया आघाडीला करायचा आहे.


आतापर्यंत नेमके कोणते प्रस्ताव फॉर्मुले इंडिया आघाडीत समोर आलेत,


- शिवसेना ठाकरे गट- 23
- काँग्रेस - 15
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट- 10 


- शिवसेना ठाकरे गट - 20
- काँग्रेस - 16
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - 10
- इतर - 2


वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव 


- राज्यातील 48 जागांपैकी शिवसेना ठाकरे गट 12 जागा
- काँग्रेस 12 जागा 
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 12 जागा 
- वंचित बहुजन आघाडी 12 जागा


त्यामुळे लोकसभा जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याआधी राज्यात इंडिया आघाडीतील नेत्यांकडून केले जाणारे  दावे, प्रतिदावे, प्रस्ताव फॉर्म्युले हे जरी समोर आणले जात असले तरी यावर आता अंतिम निर्णय लवकरच दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेतला जाणार आहे. आता ही बैठक जितक्या लवकर घेऊन यावर निर्णय घेतला जाईल तेवढा जागा वाटपावरून होणारा वाद कमी होईल आणि हा तिढा तातडीने सुटेल. अन्यथा हे दावे प्रति दावे आणि प्रस्ताव रोजच समोर येत राहतील. 


ही बातमी वाचा: