Dhangar Reservation Melava Pandharpur : सोलापूर : आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात मराठा (Maratha reservation) आणि ओबीसी (OBC reservation) समाज आक्रमक झालाय. 20 जानेवारीपासून मनोज जरांगे मराठा कार्यकर्त्यांसोबत मुंबईकडे कूच करणार आहेत. तर त्याच दिवशी ओबीसी समजानेही  मुंबईत आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. आता यामध्ये धनगर समाजाचीही (dhangar reservation) भर पडली आहे. राज्यातील धनगर समाज आक्रमक झालाय.  धनगर आरक्षणासाठी पंढरपुरातील  राज्यव्यापी निर्णायक बैठक आज होतेय. मागील 75 वर्षात न झालेला धक्कादायक निर्णय होणार असल्याचे नेत्यांनी सांगितलेय.  आरक्षणासाठी धनगर नेते आक्रमक झाल्येचं पाहायलं मिळालं. 


धनगर समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाची निर्णायक भूमिका ठरविण्यासाठी आज  पंढरपूर येथे राज्यव्यापी निर्णायक लढा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  या बैठकीमध्ये 75 वर्षात न झालेला निर्णय घेतला जाणार असल्याचे धनगर नेत्यांनी सांगितले आहे . आज यासाठी राज्यभरातील धनगर समाजाचे आजी माजी आमदार , खासदार , नगराध्यक्ष , जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य , नगरसेवक आणि समाजाचे नेते दाखल झाले आहेत. 


धनगर समाज आक्रमक - 


"अभी नाही तो कभी नाही" अशा भूमिकेने आज राज्यभरातील धनगर नेत्यांनी निर्णायक बैठक बोलावली असून या बैठकीत गेल्या 75 वर्षात झाला नाही असा निर्णय घेतला जाणार असल्याचे एका धनगर नेत्याने सांगितले. एका बाजूला मराठा समाजाचा लढा अंतिम टप्प्यात आला असताना शासन त्यांच्यासाठी काहीही करायच्या तयारीत आहे. मात्र धनगर समाजाचा वापर केवळ सत्तेसाठी आजवर सर्वच पक्षांनी करून घेतल्याचे या नेत्यांनी सांगितले. महाराष्ट्राचा सात बारा हा जणू काही मराठा समाजाच्या नावावर केल्यासारखे सत्ताधारी वागत असल्याच्या संतप्त प्रतिक्रियाही काही धनगर नेत्यांनी दिल्या. 


राजकीय पक्षांना इशारा - 


जर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण सुरु झाल्यास याचा फायदा सर्व ओबीसी समाजाला मिळणार आहे. ओबीसीमध्ये सर्वात मोठा समाज असलेला धनगर यातून बाजूला गेल्यास इतर ओबीसी जातींना याचा लाभ मिळेल, असा दावाही धनगर नेते पांडुरंग मिरगळ यांनी केला. या बैठकीचा फटका 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना बसेल, असा इशारा यशपाल भिंगे यांनी दिला. आज दुपारी बैठकीनंतर धनगर समाजाची भूमिका जाहीर केली जाणार आहे, असे सांगण्यात आलेय. 


अनेक राज्यात धनगर समाजाला एसटीचे आरक्षण 
राज्यातील धनगर समाज गेल्या अनेक वर्षांपासून अनुसूचित जमाती (ST) आरक्षणासाठी लढा देत आहे. सध्या राज्यातील धनगर समाजाला ओबीसीचे राजकीय आरक्षण आहे. मात्र, देशातील अनेक राज्यात धनगर समाजाला एसटीचे आरक्षण आहे. राज्यातील धनगड आणि धनगर या शब्दामुळे आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याचे बोलले जाते. त्यामुळे इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील धनगर समाजाला देखील अनुसूचित जमातीचे म्हणजेच एसटीचे आरक्षण देण्याची मागणी होत आहे. दरम्यान आता प्रकरण न्यायालयात जाऊन पोहचले आहे.  


आणखी वाचा :


Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी शुक्रवारी पंढरपुरात राज्यव्यापी निर्णायक लढा बैठक, शासनाला दिला जाणार अल्टिमेटम