Maharashtra HSC :  आजपासून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. संपूर्ण राज्यात 3195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 21,396 कर्मचारी कार्यरत असतील. 271 भरारी पथके संपूर्ण राज्यभरात परीक्षा दरम्यान काम करतील.  सकाळी सत्रातील परीक्षा अकरा वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी म्हणजे साडेदहा वाजता हजर राहायचं आहे तर दुपारची सत्रातील परीक्षा तीन वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांनी अडीच वाजता परीक्षा केंद्र उपस्थित राहणे अनिवार्य आहे. 


यावर्षी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रा जवळील 100 मीटर अंतरावर झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात आली आहेत.  विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेल्यास त्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. प्रत्येक तालुक्यात भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.  100% विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी झाडासाठी घेतली जाणार शिवाय चित्रीकरणही केलं जाणार आहे. 


या परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक हे बैठे पथक म्हणून प्रत्येक केंद्रावर कार्यरत असतील, परीक्षेदरम्यान गोपनीय पाकिटे ते ताब्यात घेतील शिवाय परीक्षेदरम्यान चित्रीकरण करतील. प्रश्नपत्रिका ची गोपनीयता आबाधीत ठेवण्यासाठी प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका घेऊन येणारे परिरक्षक यांनी आपली जीपीएस परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत सुरू ठेवणे बंधनकारक असेल. परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गात 25 प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट असेल हे पाकीट उघडताना त्यावर वर्गातील दोन विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतली जाईल त्यानंतर पर्यवेक्षक स्वाक्षरी करून सीलबंद पाकिटातील प्रश्नपत्रिका वितरित केली जातील. 


शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच राहणार - 
आजपासून बारावी बोर्ड परीक्षा सुरू होत असताना सुद्धा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच राहणार आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका काही प्रमाणात बारावी बोर्ड परीक्षा आयोजनाला बसू शकतो. मागण्या संदर्भात शासन निर्णय जारी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा इशारा देण्यात आला आहे. 


आजपासून बारावी बोर्ड परीक्षा सुरू होणार असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अद्यापही आपलं आंदोलन मागे घेतलेले  नाही. त्यामुळे  बारावी बोर्ड परीक्षा सुरू होत असताना काही प्रमाणात अडथळे शिक्षकांना येऊ शकतात. शिक्षकेतर कर्मचारी हे दहावी बारावी बोर्ड परीक्षा दरम्यान प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका वितरित करताना मदतनीस म्हणून काम करतात. बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या  आसन व्यवस्थेसाठी बेंच आणि बोर्ड वर नंबरिंग करण्याचं काम शिक्षकेतर कर्मचारी करतात. परीक्षेच्या आधी किंवा परीक्षा सुरू असताना शिक्षकांना,विद्यार्थ्यांना स्टेशनरी व संबंधित वस्तूंची गरज भासल्यास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून त्या पुरवल्या जातात. शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आडून आहेत यामध्ये पूर्ण सातवा वेतन लागू करणे जुनी पेन्शन योजना लागू करणे रिक्त जागा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तातडीने भरणे, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे या मुख्य मागण्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांसोबत मागे आठवड्यात बैठक होऊन सुद्धा जोपर्यंत लेखी या मागण्या मान्य होत नाहीत आणि शासन निर्णय जारी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा पवित्रा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने घेतला आहे.


बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या शुभेच्छा-


‘कोविड’च्या प्रादुर्भावानंतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून परीक्षा निकोप पार पडाव्यात, विद्यार्थ्यांचे परीक्षांबाबत दूरध्वनीद्वारे शंका समाधान व्हावे यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विभागीय मंडळस्तरावर नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सवलती देण्यात येत असून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाची मदत घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन मंत्री केसरकर यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.