Hingoli Accident News : हिंगोलीमध्ये लग्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 20 ते 25 जण जखणी झाले आहेत. हिंगोली ते नांदेड रोडवरील पार्डी मोड फाट्यावर बुधवारी हा अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला.  अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 


बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्याचे समजतेय. या अपघातातील मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तसेच जखमींना उपचारासाठी कळमनुरी आखाडा बाळापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. क्रेन व जेसीबीच्या साह्याने ट्रकला हलविण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे हिंगोली ते नांदेड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 


 या अपघातामध्ये पंचफुलाबाई गजभार, विठ्ठल कनकापुरे, त्रिवेणीबाई आजरसोंडकर, राजप्पा आजरसोंडकर या चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य 24 जण उपचारासाठी विविध रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस आणि आखाडाबाळापुर पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बाळापुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. जेसीबीच्या साह्याने अपघातग्रस्त वाहनाखाली अडकलेले प्रवासी बाहेर काढण्यात त्यांना यश आले आहे. 


याशिवाय परिसरातील गावकरी घटनास्थळी एकत्र जमले होते. पोलीस त्याचबरोबर गावकर यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलून या जखमी आणि मयत प्रवाशांना रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अपघातामध्ये कंटेनर उलटल्यामुळे त्याखाली असलेले दोन जणांचे मृतदेह हे जेसीबी च्या साह्याने बाहेर काढावे लागले. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. आणि आता ही वाहतूक सुरळीत आहे परंतु अपघातात अनेक प्रवासी हे गंभीर जखमी झाल्याने मयताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 



संबधित बातम्या : 
Sanjay Raut : महाराष्ट्र सरकार कायद्याप्रमाणे वागतंय, त्याला कोणी अतिशहाणपणा शिकऊ नये; संजय राऊतांचा नारायण राणेंना टोला
 Narayan Rane : काल नारायण राणे म्हणाले, मी मूर्ख वाटलो का, आज पोलिसांनी नोटीसच धाडली, मात्र नोटीसमध्ये नेमकं काय?