Maharashtra Highway Speed Limit : महामार्ग आणि एक्स्प्रेस वेवरील स्पीड लिमिट म्हणजेच जास्तीत जास्त वेग मर्यादा लवकरच ( raise national highway speed limits ) वाढण्याची शक्यता आहे. कारण केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी ( nitin gadkari ) यांनी तसे संकेत दिले आहेत. औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच हाय वेवरील वेगमर्यादा वाढणार असल्याचे सांगितले. त्यामुळे हाय वेवरील प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. 


हाय वेवर 90 च्या पुढे गाडी आपली गेली तर दोन हजार रुपयांचा दंड बसतो मात्र, लवकरच यावर तोडगा काढणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. सुसाट रस्ते तर बनवले मात्र त्यावर जाताना स्पीड लिमिट ओलांडली तर दंड अटळ आहे. रस्ता कसाही असला तरी त्यावर गती ही 80 ते 90 च्या घरात ठेवली जायची. त्यावरच आता तोडगा निघणार असल्याचे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. स्पीड गन चा मुद्दयावर  तोडगा काढण्यासाठी लवकरच बंगलोरमध्ये बैठक होणार आहे. त्यामध्ये राज्य आणि केंद्र मिळून नवे नियम तयार करणार आहे.  त्यामुळं मोठ्या रस्त्यांवर सुसाट जाता येईल असे गडकरी म्हणाले. लवकरच कायद्यात बदल होईल असेही नितीन गडकरी म्हणाले. 


पुणे-औरंगाबाद फक्त अडीच तासांत - 
पुणे-औरंगाबाद महामार्ग 6 लेनचा  बांधायचं ठरलं आहे.  हा महामार्ग 268 किमी लांबीचा असेल. आज या बाबत अंतिम आराखडा झाला आहे. पुणे औरंगाबाद अंतर अडीच तासांत पूर्ण होईल. या रस्त्याला सुरत आणि चेन्नई हायवे कनेक्ट करण्यात येणार आहे. त्यासोबतच हा महामार्ग समृद्धी महामार्गालाही जोडला जाणार आहे. यासाठी तब्बल 12 हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. औरंगाबाद, दिल्ली, बंगलोर, चेन्नई असा हा एकच मार्ग होईल, असे नितीन गडकरी म्हणाले.  पुण्यात  कुठल्याही भागात जायला आता शहरात जायची गरज नाही, हा पुणे रिंग रोड ला कनेक्ट होईल, असेही गडकरी म्हणाले. 


मराठवाडयात 2 हजार कोटींचे नवे प्रोजेक्ट  - 
औरंगाबाद ते पैठण हा रस्ता चार पदरी करणार असून हा 500 कोटींचा रस्ता आहे. औरंगाबादमध्ये डबल डेकर पूल बनवू, शहरातून विमानतळ जाणार हा रस्ता, हा शहराची ओळख असणारा रस्ता होईल. मराठवाडयात 56 प्रोजेक्ट होते, त्याचे 80 टक्के काम झाले आहे.  आता मराठवाडयात 2 हजार कोटींचे नवे प्रोजेक्ट  करणार आहे, असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.