Eid-ul-Fitr 2022 : रमजानच्या पवित्र महिन्यात काल 29 व्या दिवशी चंद्रदर्शन झालं नाही. त्यामुळं आज 30 रोजे पूर्ण करुन उद्या, 3 मे मंगळवारी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. रविवारी शव्वालचा चंद्र दिसला नाही. त्यामुळं आज सोमवारी 30 वा रोजा होणार आहे आणि उद्या मंगळवारी देशभरात ईद साजरी होईल. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षात कोरोनामुळं ईद बंधनात साजरी करावी लागली होती. यंदा कोरोनाचे निर्बंध हटल्यानं ईदचा उत्साह असणार आहे.  


ईद उल फित्र अर्थात रमजान ईद आता 3 मे रोजी साजरी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सोलापूरच्या रुयते हिलाल कमिटीनं हा निर्णय घेतला आहे. काल चंद्रदर्शन न झाल्याने आज 30 रोजे पूर्ण करून मंगळवारी रमजान ईद साजरी केली जाणार आहे, असं सोलापूर शहर आणि जिल्हा काझी अब्दुर्र राफे यांनी सांगितलं आहे. 


ईदच्या निमित्तानं बाजारात देखील उत्साह असून खरेदीसाठी गर्दी होत असल्याचं चित्र आहे.  ईदचा सण म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण होय. इस्लाममध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचा शेवट या ईदने होतो. जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि एकमेकांसाठी प्रार्थना करतात. 
 
गेल्या वर्षी ईदवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन हा सण साजरा करण्यात आला होता.  


इस्लाम धर्मामध्ये असं मानलं जातं की, रमजानमध्ये दयेचे दरवाजे उघडले जातात. या महिन्यात केल्या जाणाऱ्या नमाजाचे पुण्य कैक पटींनी वाढते. रमजान महिन्याचे 10-10 दिवसांनी तीन भाग केले जातात आणि त्याला अशरा असं म्हणतात. पहिल्या अशरामध्ये असे मानले जाते की अल्लाह दया करतो. दुसऱ्या अशरामध्ये पापांची क्षमा असते, तर तिसरा अशरा नरकातील आगीपासून स्वतःला वाचवण्यासाठी असतो. 


इतर महत्वाच्या बातम्या



EID Special 2022 : ईदच्या खास मुहूर्तावर पाहुण्यांसाठी घरच्या घरी बनवा खजूर मिल्क शेक; ही घ्या साहित्य आणि कृती