लातूर : विमा कंपन्या आणि बँका एकत्र मिळून शेतकऱ्यांना कसे लुटतात याचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या योगेश शेळके याने बँकेची बदनामी केली असल्याचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे म्हणणे आहे. त्यामुळे बँकेने योगेश शेळकेवर एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. त्यासंबधी बँकेने योगेश शेळकेला नोटीस पाठवली आहे.

दरम्यान, "मी शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ तयार केला होता. परंतु बँकेने मात्र आपल्यावर एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. माझ्याकडे इतके पैसे नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणात लक्ष घालावे," अशी विनवणी योगेशने दुसऱ्या एता व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे. "मंत्रालयात आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नाही," असे योगेश व्हिडीओमध्ये म्हणत आहे.

बजाज अलायन्झ या विमा कंपनीत काम करणाऱ्या योगेशनेमहाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बजाज आलायन्झवर गंभीर आरोप केले होते. त्याने म्हटले होते की, "महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांवर बजाज आलायन्झ या खासगी कंपनीचा विमा (इन्शॉरन्स) घेण्यासाठी दबाव आणला जात आहे."