कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील देणगीचं बुधवारी मोजमाप करण्यात आलं. यामध्ये अंबाबाई देवस्थानला भक्तांकडून भरभरून दान करण्यात आल्याची माहिती समोर आली.


2019- 20 या आर्थिक वर्षात तब्बल 83 लाख रुपये किंमतीचे दागिने भक्तांनी दान केल्याचं या मोजणीतून उघड झालं. अंबाबाई आणि श्री जोतिबा मंदिराच्या 2 किलो 186 ग्राम सोनं अर्पण करण्यात आलं आहे


कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा या दोन्ही मंदिरांत 25 किलो 982 किलोग्राम चांदीही अर्पण करण्यात आली आहे. हे सर्व दागिने आता योग्य पद्धतीनं जतन करण्यात येतील. देवस्थान समितीनं दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2019 चे मार्च 2020दरम्यानच्या काळात अंबाबाई मंदिरात 71 लाख, तर जोतिबा मंदिरात 12 लाखांचे दागिने अर्पण करण्यात आले आहेत.


एकिकडे मंदिरांमध्ये करण्यात आलेलं दान आणि मोजणीनंतर समोर आलेले आकडे भुवया उंचावत असले तरीही कोरोना काळातील लॉकडाऊन नियमांमुळं यातही घट झाली असल्याचं कळत आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार कोरोना काळात मंदिरं अनेक महिने बंदच होती. ज्यामुळं मंदिराच्या दिशेनं भाविक न आल्यामुळं मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 43 लाखांच्या दागिन्यांत घट झाल्याचं म्हटलं जात आहे.