हिंगोली : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातील राजकारण ढवळून काढणारी निवडणूक म्हणजे ग्रामपंचायत. या निवडणुकी अगदी 21 वर्षाच्या तरुणासह 85 वर्षांच्या आजीबाईंनी सहभाग घेतला आणि निवडूनही आल्या. ग्रामपंचायतीच्या राजकारणात फॉरेन रिटर्न पीएचडीधारक महिलने सहभाग घेतला होता आणि त्यांचा विजय देखील झाला. डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे असं त्यांचं नाव आहे.


हिंगोलीच्या दिग्रसवाणी ग्रामपंचायतीत वंचितच्या बहुजन आघाडी पुरस्कृत ग्राम विकास पॅनलने नऊ जागांवर निवडणूक लढवली होती. नऊ पैकी आठ जागांवर वंचितच्या उमेदवारांनी विजय मिळवून गावातील प्रस्थापित पुढाऱ्यांना धक्का दिला. वंचित बहुजन आघाडीच्या आदिवासी समूहाच्या फॉरेन रिटर्न डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे यांच्या नेतृत्त्वात ही निवडणूक लढवण्यात आली होती. त्या स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित होऊन दिग्रसवाणी इथे सर्वसमावेशक उमेदवार उभे केले होते. एकूण नऊपैकी आठ जागांवर वंचितचे उमेदवार निवडून आणून कुऱ्हे दाम्पत्याने चमत्कार घडवला आहे. विशेष बाब म्हणजे चूल आणि मूल असंच आयुष्य असलेल्या सहा महिला या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.



डॉ. चित्रा कुऱ्हे यांनी पॉलिटिकल सायन्स या विषयात स्वीडनमध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. डॉ. अनिल कुऱ्हे आणि डॉ चित्रा कुऱ्हे हे दाम्पत्य आठ वर्षे विदेशात होते. त्यांनी स्वीडनसह जपान आदि देशात वास्तव केले आहे. असे असले तरी या दाम्पत्याने आपल्या मातीसोबतची नाळ कायम घट्ट ठेवली आणि ते भारतातील आपल्या गावात परतले. फक्त गावात येऊन विकास आणि प्रगतीच्या गप्पा न मारता ते प्रत्यक्षात घडावं यासाठी त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि विजयी देखील झाल्या. दरम्यान दिग्रसवाणी ही आदर्श ग्रामपंचायत बनवणार असा निर्धार डॉ चित्रा कुऱ्हे यांनी व्यक्त केला.


हिंगोली जिल्हा ग्रामपंचायत निकाल
एकूण : 495 ग्रामपंचायत
काँग्रेस - 17
राष्ट्रवादी - 136
शिवसेना - 150
भाजप - 67
वंचित बहुजन आघाडी - 1
स्थानिक आघाड्या - 51
बिनविरोध - 73