मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करण्यात येत आहे. या निवडणुकीत भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीतील पक्षांनाही काही ठिकाणी धक्का बसला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीत प्रस्थापितांना धक्का देत नवख्यांच्या हाती सत्ता आल्याचे पाहायला मिळाले.


कोरोना महामारीनंतर जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका अनेक अर्थाने महत्वाच्या होत्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीने या ग्रामपंचायात निवडणुका एकत्रित लढल्या. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी आपला मतदारसंघ मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका महत्वाच्या असतात. त्यामुळे सर्वच नेत्यांनी आपापली ताकद लावली होती.


ग्रामीण भागात शिवसेनेचा शिरकाव
महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सत्तारूढ झालेल्या शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सत्ता काबीज केलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर ग्रामपंचायत जिंकून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना धक्का दिलाय तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी शिरकाव केलाय. राज्यातील सत्तेचा खालपर्यंत झिरपत जाणारा प्रभाव मागील वेळी जसा भाजपच्या बाबतीत पाहायला मिळाला होता तसा तो यावेळी शिवसेनेच्या बाबतीत पाहायला मिळतोय.


कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर या आपल्या मूळ गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक आपल्यासाठी प्रतिष्ठेची आहे हे ओळखून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतः त्यामध्ये लक्ष घातलं होतं. इतकंच काय त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना हाताशी देखील धरलं होतं. पण शिवसेनेच्या प्रकाश अबिटकरांनी इथं बाजी मारली. पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर या पुणे-बँगलोर महामार्गालगत असल्याने महत्व प्राप्त झालेल्या गावातील सत्ताही शिवसेनेने राष्ट्रवादीकडून खेचून घेतली. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे यांच्या पॅनेलने इथं 11 पैकी नऊ जागांवर विजय मिळवला आहे.


पालकमंत्री अशोक चव्हाण यांच नांदेड जिल्ह्यावर वर्चस्व


काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नांदेडची ओळख आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांचं वर्चस्व जिल्ह्यावर आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व अनेक ग्रामपंचायतीवर सिद्ध झालंय तर भाजपची फारशी सरशी या निवडणुकीत झाल्याचे दिसून येत नाही. लोहा कंधार मतदार संघातील 159 ग्रामपंचायतपैकी 33 ग्रामपंचायतीवर भाजपने सत्ता संपादन केली आहे. परंतु जिल्ह्यातील इतर 14 तालुक्यात भारतीय जनता पार्टी आपली जादू दाखवू शकली नाही. त्यामुळे भाजपला तोंडघशी पडून महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात मुसंडी मारली आहे.


उत्तर रत्नागिरी : काका पुतण्याच्या लढाईत काकांनी बाजी मारली
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड या पाच तालुक्यापैकी दोन तालुक्यात महत्वाची लढत होती. यापैकी चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांचे गाव सावर्डे. या गावात 17 उमेदवारांपैकी 8 बिनविरोध तर 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. शेखर निकम यांच्या पॅनल चे 9 च्या 9 उमेदवार निवडून आले. पुन्हां एकदा शेखर निकम आपल्या गावात विजयाचा गड राखण्यात यशस्वी झाले आहेत तर माजी मंत्री आणि सध्याचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे गाव तुरंबव या गावात त्यांचे सख्ये बंधू सुनिल जाधव यांच्या विरोधात त्यांच्याच चुलत भावाचा मुलगा स्वप्नील जाधव हा निवडणुकीच्या रिंगणात उभा होता. काका पुतण्याच्या लढाईत काकांनी बाजी मारली तर पुतण्याला पराभव पत्करावा लागला.


सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी
सांगली जिल्ह्यात 152 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली, काँग्रेस बरोबर शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. खानापूर-आटपाडी मतदारसंघात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या गटाला मोठे यश मिळाले आहे. तर कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या मतदार संघात काँग्रेसला देखील चांगले यश मिळाले आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचं आपले वर्चस्व
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपकडे 45 ग्रामपंचायती तर सेनेकडे 21 ग्रामपंचायती आल्या आहेत. राष्ट्रवादीने 1 आणि गाव पॅनेलने 3 ग्रामपंचायती राखल्या आहेत. जिल्ह्यात राणेंनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. मालवणमध्ये आमदार वैभव नाईक यांना तर सावंतवाडी मध्ये माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे.


यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आमदार निलंय नाईक यांच्या गटाचे वर्चस्व. अनिल नाईक यांच्या नेतृत्वात 7 पैकी 7 जागांवर विजय. 7 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या होत्या. मात्र, 1 जागेसाठी निवडणूक लागली ती 1 जागाही आमदार निलंय नाईक यांच्या गटाकडे आहे.


हिंगोली जिल्ह्यात आज एकुण 462 ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी पार पडली. ज्यात अनेक प्रस्थापित नेत्यांना गावकऱ्यांनी धक्के दिलेत. ज्यात महत्वाचे म्हणजे वसमत तालुक्यातील शिवसेनेचे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या पांगरा शिंदे गावात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजु नवघरे व माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या पॅनलचा भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अवधुत शिंदे यांच्या पॅनलने 11 पैकी 9 जागांवर विजय मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे या दोन्ही दिग्गज नेत्यांना मोठा धक्का बसलाय. शिवाय शिवसेनेचे नेते तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ज्या बळसोंड गावात सेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला त्याठिकाणीही शिवसेनेला एकही जागा मिळवता आली नाही. तिथेही भाजपच्या पॅनलने 13 पैकी 13 जागा जिंकल्यात. तसेच शिवसेनेचे नेते माजी खासदार शिवाजी माने यांच्या कान्हेंगावातही त्यांना केवळ 2 जागा मिळाल्यात इथल्या श्रीकांत वाघमारे यांनी 5 जागा जिंकुन मानेंच्या 25 ते 30 वर्षांपासूनच्या सत्तेला छेद दिलाय इथे शिवाजी माने यांचे पुतणे दत्ता माने यांचे पॅनल उभे होते मात्र त्यांना केवळ 2 च जागा मिळाल्यात.


बारामतीत सर्वच्या सर्व 49 जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे
बारामतीत सर्वच्या सर्व 49 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राखण्यात यशस्वी. तर दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. या निकालाने संपूर्ण बारामतीत जल्लोष साजरा करण्यात येतोय. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून राष्ट्रवादीने आघाडी घेतली होती ती शेवटपर्यंत कायम ठेवली. विरोधकांना बारामतीत एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. या निकालाने बारामती तालुका राष्ट्रवादी काँगेसचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


उदयनराजेंना मोठा धक्का
सातारा शहरालगत असलेल्या आणि खासदार उदयनराजेंनी दत्तक घेतलेल्या कोंडवे ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाला 13 पैकी केवळ 3 जागा तर आमदार शिवेंद्रराजे गटाला 10 जागेवर विजय मिळवला आहे.