मुंबई : महाराष्ट्रातील कर्करोगग्रस्तांना आता जिल्हा रुग्णालयांमध्येच पूर्णपणे मोफत केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. येत्या जून महिन्यापासून या योजनेचा पहिला टप्पा सुरु होणार असून, पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यातील गरीब आणि गरजू रुग्ण सध्या केमोथेरपीसाठी मुंबईतील टाटा मोमोरियल हॉस्पिटलमध्ये येतात. त्यामुळे अर्थात या रुग्णांना शारीरिक त्रास होतोच, सोबत मानसिक त्रासही होतो. आता जिल्हा रुग्णालयांमध्येच केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करुन देण्याची योजना आणली जात असल्याने रुग्णांच्या निवास आणि प्रवासाचा खर्चही वाचणार आहे.

पहिल्या टप्प्यात कोण-कोणते जिल्हे?

  1. नागपूर

  2. गडचिरोली

  3. पुणे

  4. अमरावती

  5. जळगाव

  6. नाशिक

  7. वर्धा

  8. सातारा

  9. भंडारा

  10. अकोला


या दहा जिल्ह्यांमधील जिल्हा रुग्णालयांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. जून महिन्यापासून या जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये पहिल्या टप्प्यात मोफत केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल.

जिल्हा रुग्णालयात कॅन्सरवरील केमोथेरपीसाठी जी काही औषधं लागतात, ती औषधं मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून पुरवण्यात येणार असून, संबंधित डॉक्टरनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे.

राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार, दरवर्षी देशात सुमारे 11 लाख लोकांना कर्करोगाचं निदान झाल्याचे आढळून येते.  तसेच दरवर्षी सुमारे 5 लाख रुग्ण कर्करोगामुळे मृत्यूमुखी पडतात, तर आजच्या घडीला सुमारे 28 लाख रुग्ण कर्करोगाशी झुंज देत आहेत.