मुंबई : भविष्यानेही आशेने पाहावे अशा वर्तमानाचा गौरव सोहळा असलेल्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. महाराष्ट्रातील बारा युवा चेहऱ्यांच्या कार्याचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला. रविवार, 8 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10 ते 11 आणि रात्री 9 ते 10 या वेळेत 'एबीपी माझा'वर या सोहळ्याचं प्रसारण होणार आहे.

सौरभ पाटणकर, अमृता हाजरा, जव्वाद पटेल यांना संशोधन क्षेत्रातील कार्यासाठी, यजुवेंद्र महाजन, सागर रेड्डी यांना सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी, वैशाली शडांगुळे यांना पेहरावशैलीसाठी तर शंतनू पाठकला नवउद्यानासाठी तरुण तेजांकित पुरस्काराने गौरवण्यात आले.

क्रीडा क्षेत्रातून प्रसिद्ध धावपटू ललिता बाबर आणि कविता राऊत या दोघींची निवड करण्यात आली. कला क्षेत्रातून निपुण धर्माधिकारी, राहुल भंडारे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना तरुण तेजांकित पुरस्काराने गौरवण्यात आलं.

साहित्य-कलेपासून समाजसेवेपर्यंत, विज्ञान-तंत्रज्ञानापासून राजकारणापर्यंत समाजातील विविध क्षेत्रांमध्ये पाय रोवून काम करणारे अनेक तरुण आपल्याभोवती आहेत. आपल्या कामाने, त्यामागील विचाराने त्या-त्या क्षेत्रालाही ते नवे आयाम देत आहेत. कोणी आपल्या नैपुण्याने कलाक्षेत्र गाजवत आहे, तर कोणी सर्व कोलाहलापासून दूर राहून वैज्ञानिक प्रयोगशाळांत नवनवे शोध लावत आहे. ज्यांच्याकडे आस लावून पाहावे असे हे राष्ट्राचे वर्तमान आहे. त्या सर्वाचा संघर्ष, त्यांचे यश हे समाजासाठी प्रेरणादायी असून ते सर्वासमोर यावे हा तरुण तेजांकित उपक्रमामागचा महत्त्वाचा हेतू आहे.

मूळचा बदलापूरचा असलेला संशोधक सौरभ पाटणकर लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्काराचा पहिला मानकरी ठरला. सौरभने केलेल्या संशोधनामुळे महागडी वैद्यकीय उपकरणं स्वस्तात उपलब्ध होऊ शकली.

अमृता हाजरा लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्काराची दुसरी मानकरी ठरली. अमृताने कॅलिफोर्निया येथे शिक्षण घेतले. सध्या तिचे पुण्यात संशोधन सुरु आहे.

जव्वाद पटेल तरुण तेजांकित पुरस्काराचा तिसरा मानकरी ठरला. फोनवर बोलू न देणारं हेल्मेट त्याने तयार केलं होतं. या अफलातून संशोधनातून भविष्यात कितीतरी अपघात टळतील.

सामाजिक क्षेत्रातील तरुण तेजांकित पुरस्कार दीपस्तंभ फाऊंडेशनच्या यजुवेंद्र महाजनला मिळाला.

अनाथाश्रमातून बाहेर पडलेल्या तरुणांना काम मिळावं, यासाठी संस्था चालवणाऱ्या सागर रेड्डीलाही तरुण तेजांकित पुरस्काराने गौरवण्यात आलं.

सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या नाशिकच्या कविता राऊत आणि ललिता बाबरला क्रीडा क्षेत्रातील लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्काराने गौरवण्यात आलं.

वैशाली शडांगुळे हिला पेहरावशैलीसाठी तरुण तेजांकित पुरस्काराने गौरवण्यात आलं.

शंतनू पाठकला नवउद्यानासाठी तरुण तेजांकित पुरस्काराने गौरवण्यात आलं.

कला क्षेत्रासाठी लेखक-दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, निर्माते राहुल भंडारे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना तरुण तेजांकित पुरस्काराने गौरवण्यात आले.

फ्यूजन संगीतकार आणि कीबोर्डवर शास्त्रीय संगीताचे वादक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केलेले अभिजित पोहनकर यांच्या कार्यक्रमाने सोहळ्याला सुरुवात झाली.

उद्योग, कला, क्रीडा, समाजसेवा आणि राजकारण अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवर या सोहळयासाठी उपस्थित होते. उद्योगपती बाबासाहेब कल्याणी आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.