मुंबई : शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी आणखी वेळ मागितला होता. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तो नाकारला आहे. मात्र राज्यपालांनी वेळ देण्यास नकार दिला असेल तर हे चुकीचं आहे, असं काँग्रेस नेते, ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी ट्वीट करुन आपलं मत मांडलं आहे.
अभिषेक मनु सिंघवी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानुसार राज्यपालांनी दोन दिवसांचा अवधी नाकारला आहे. हे सत्य असेल तर चुकीचे आहे. कारण राष्ट्रपती राजवट हा सर्वात शेवटचा पर्याय असू शकतो. त्याआधी सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी सर्व पर्याय तपासून पाहणे गरजेचं आहे. वाढवून मागितलेले 48 तास जास्त वेळ नव्हता. राज्यपालांना वेळ वाढवून देण्यास नकार दिला हे अयोग्य आणि निराशाजनक आहे."
भाजप आणि शिवसेनेनंतर राज्यपालांनी आता तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीला एकत्र यावं लागणार आहे. उद्या काँग्रेसशी चर्चा केल्यावर शिवसेनेशी चर्चा करावी लागणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे फोनवरुन संभाषण झालं, असं अजित पवार यांनी सांगितलं.
त्याआधी भाजपच्या नकारानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी काल निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर आज दिवसभर राजकीय घडामोडींनंतर काँग्रेसने तळ्यात-मळ्यात अशी भूमिका घेतल्याने शिवसेनेची कोंडी झाली. सत्तास्थापना करण्यासाठी आम्ही दावा केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी आम्हाला किमान दोन दिवसांचा वेळ गरजेचा आहे. यासाठी आम्ही राज्यपालांकडे वेळ मागितला होता, मात्र त्यांनी त्यासाठी नकार दिला आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत 105 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. अपक्षांच्या पाठिंब्यासह भाजपचं संख्याबळ 118 वर पोहोचलं होतं. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं होते. मात्र शिवसेनेशिवाय पुरेसं संख्याबळ नसल्याने भाजपने सत्तास्थापन करण्यास असमर्थता दर्शवली होती.
संबंधित बातम्या
- सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी मुदतवाढीला राज्यपालांचा नकार, वेळ नाकारली दावा कायम : आदित्य ठाकरे
- सत्तास्थापनेसाठी भाजप, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीला राज्यपालांकडून निमंत्रण