Maharashtra Cabinet GR: राज्य सरकारने (Maharashtra Govt) काही दिवसांपूर्वी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती (Intercaste and Interfaith Marriage Coordinating Committee) जाहीर केली होती. यात बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. आता फक्त आंतरधर्मीय विवाहांसाठीच (Interfaith Marriage) ही समिती काम करणार आहे, तसा बदल करत नवा शासन निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Govt) जाहीर केला आहे. त्याशिवाय यासाठी हेल्पलाईनची घोषणाही केली आहे.
इरफान अली पिरजादे यांचा समितीत समावेश तर योगेश देशपांडेंना काढलं
इरफान अली पिरजादे या नव्या सदस्याचा समावेश या समितीत करण्यात आला आहे. नांदेडच्या अॅड. योगेश देशपांडे यांना या समितीतून काढलं आहे. त्यांनी नकार दिला असल्याने त्यांना काढलं असल्याची माहिती आहे. योगेश देशपांडे यांनी तशा स्वरुपाचे पत्र पाठविले होते. राज्य सरकारकडे त्यानुसार त्यांचा राजीनामा स्वीकारत नव्या सदस्यांचा समावेश या समितीत केला आहे.
आता 'आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती
महाराष्ट्र राज्याचे महिला व बालविकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी पत्रकार परिषद घेऊन, आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती स्थापन केल्याबाबत माहिती दिली होती. आता राज्याच्या महिला व बालविकास विभागाने या समितीच्या नावात बदल केला असून, विभागाने काढलेल्या नवीन जीआरनुसार समितीच्या नावातील आंतरजातीय हा शब्द वगळण्यात आला आहे. आता 'आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती (राज्यस्तरीय)' असे या समितीचे नाव असणार आहे. तसेच केवळ याच प्रकारातील तक्रारींचे निवारण करण्याचे काम ही समिती करणार आहे.
आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुली किंवा महिलांना काही तक्रार उद्भवल्यास त्यांच्यासाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे देखील या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. श्रद्धा वालकर प्रकरण घडल्यानंतर, यापुढील काळात असे प्रकार घडू नयेत आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुली किंवा महिला व त्यांचे मूळ कुटुंबीय यांच्यात समन्वय साधण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.
ही बातमी देखील वाचा
Mangalprabhat Lodha : लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती