मुंबई: त्रिभाषिक सूत्राचा वापर करा आणि रेल्वेच्या माहिती फलक, जाहिराती आणि प्रेस रिलीजमध्ये हिंदी, इंग्रजी सोबत आता मराठीचाही वापर करा असं महाराष्ट्र सरकारनं कोकण रेल्वेला सांगितलं आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारच्या मराठी विभागाच्या वतीनं कोकण रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापक संचालकांना याबाबत एक पत्र पाठवण्यात आलं आहे.


कोकण रेल्वेच्या वतीनं त्यांच्या कामकाजात त्रिभाषिक सूत्राच्या नियमांच पालन करण्यात येत नसून त्यात केवळ हिंदी आणि इंग्रजीचा वापर करण्यात येतोय. कोकण रेल्वेकडून मराठी भाषेला डावलण्यात येतंय अशी तक्रार महाराष्ट्र सरकारकडे आली होती. या तक्रारीची नोंद घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने कोकण रेल्वेला त्यांच्या कामकाजात मराठीचा वापर करावा असं सांगितलं आहे.


केंद्र सरकारच्या नियमांनुसार महाराष्ट्र राज्यातील केंद्र सरकारच्या प्रत्येक कार्यालयात त्रिभाषिक सुत्राचा वापर करणं बंधनकारक आहे असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यानुसार कोकण रेल्वेची सर्व माहिती फलक, जाहिराती आणि प्रेस रिलीजमध्ये मराठी वापरणे बंधनकारक असल्याचं सांगण्यात आलं आहे. याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या राजभाषा विभागाने भारतीय रेल्वेला त्या-त्या वेळी यासंबंधीच्या निर्णयाची माहिती दिली आहे असंही या पत्रात सांगण्यात आलं आहे.


कोकण रेल्वे प्रकल्प हा मुंबई जवळील रोहा ते मेंगलोर या दरम्यानचा एकूण 756 किमी लांबीचा रेल्वेमार्ग आहे. हा मार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांतून जातो. या रेल्वे मार्गात अनेक दऱ्या,नद्या, पर्वत आणि समृध्देने नटलेल्या निसर्गाचा समावेश होतो.


पहा व्हिडिओ: Konkan Railway | कोकण रेल्वेला मराठी भाषेत जाहिराती, फलकांचा मजूर लिहिण्याच्या राज्य सरकारच्या सूचना


[/


महत्वाच्या बातम्या: