ठाणे : तिकीट काढून अधिकृतरीत्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत अनेक प्रवासी हे विनातिकीट प्रवास करत असतात. अशा प्रवाशांना शोधून त्यांच्यावर मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. या कारवाईच्या दंडातून तब्बल दीड कोटी रुपये मध्य रेल्वेने वसूल केले आहेत. ही कारवाई उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये या वर्षीच्या जून महिन्यापासून 20 नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे.


विनातिकीट अनधिकृत प्रवास करणार्‍या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने विशेष तपासणी मोहीम सुरु केली होती. या मोहिमेअंतर्गत गेल्या केवळ पाच महिन्यात 43, 516 प्रवासी विनातिकीट प्रवास करताना पकडले गेले. या अनधिकृत प्रवाशांवर मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि तिकिट तपासणी कर्मचारी यांनी दंडात्मक कारवाई केली. यातून मध्य रेल्वेने 1 कोटी 50 लाख रुपयांचा दंड जमा केला आहे.


43,516 प्रकरणांपैकी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये म्हणजेच लोकलमध्ये 39,516 प्रकरणे तर लांब पल्ल्यांच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये चार हजार प्रकरणे आढळून आली आहेत. लोकलमधील विनातिकीट प्रवाशांकडून 1 कोटी 10 लाख रुपये दंड तर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील विनातिकीट प्रवाशांकडून 40 लाख रुपये दंड म्हणून जमा करण्यात आले आहेत.


दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी योग्य तिकीट काढून प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.