मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे आधीच वादात सापडलेले महाराष्ट्राचे राज्यपाल पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी आणि जवानांना श्रद्धांजली वाहिली. मात्र राज्यपालांनी श्रद्धांजली वाहताना त्यांची चप्पल काढली नाही. राज्यपालांनी अशा प्रकारे श्रद्धांजली वाहणे हा काँग्रेसने हुतात्म्यांना अपमान म्हटले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावत यांनी एक व्हिडिओ ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या आरोपानंतर राज्यपाल कार्यालयानं स्पष्टीकरण दिलंय.
"अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. राज्यपाल चप्पल न काढताच अभिवादन करत असतानाचा व्हिडीओ शेअर करत सचिन सावंत यांनी संताप व्यक्त केलाय.
काँग्रेसच्या आरोपानंतर राज्यपाल कार्यालयानं देखील यावर स्पष्टीकरण दिलं आहे. "अलीकडेच राज्यपालांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक या ठिकाणी भेट दिली होती. त्याठिकाणी देखील हीच पद्धत पाळली जाते. त्यामुळे चप्पल पायात असताना हुतात्म्यांना अभिवादन केल्यामुळे राज्यपालांनी हुतात्म्यांचा अपमान केला असे म्हणणे अतिशय द्वेषपूर्ण आणि खोडसाळपणाचे आहे, असे राजभवनातून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सचिन सावंत यांच्या ट्विटनंतर भाजप नेते केशव उपाध्य यांनी देखील पलटवरा केला आहे. "सचिन सावंतजी केलेत ना पुन्हा अज्ञानाचे प्रदर्शन. किमान पोलिस प्रशासनाशी बोलून घेतले असते. 26/11 च्या अभिवादन कार्यक्रमात बूट किंवा चप्पल काढली जात नाही. तशा पद्धतीचे ब्रिफिंग पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त अभिवादन करायला येणार्या मान्यवरांना करीत असतात. हा नियम आहे. आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पायातून बूट काढल्यानंतर मग सर्वांनी ते काढले. गेल्यावर्षीचा हा व्हीडीयो पाहा. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे अभिवादन करीत आहेत आणि त्यांच्या पायात बूट आहे. मग तेव्हाही मराठी संस्कृती न जपल्याची आठवण आपल्याला झाली होती का?" असा प्रश्न केशव उपाध्ये यांनी उपस्थित केलाय.