Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असलेल्या किटवाड धबधब्यात बेळगावमधील 4 महाविद्यालयीन तरुणींचा मृत्यू झाला. एका तरुणीला बाहेर काढण्यात यश मिळाले असून तिला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. उज्वल नगर येथील असिया मुजावर (वय 17), अनगोळची कुदासिया पटेल (वय 20), रुक्षार बिस्ती (वय 20) आणि तस्मिया (वय 20) अशी बुडून मृत्यू झालेल्या तरुणींची नावे आहेत. याप्रकरणाची चंदगड पोलिसात नोंद झाली आहे. बेळगावहून 40 कॉलेज तरुणींचा गट विकेंड साजरा करण्यासाठी किटवाड धबधबा येथे गेल्या होत्या. त्यावेळी पाच तरुणी सेल्फी काढण्यासाठी थांबल्या होत्या. सेल्फी काढताना पाय घसरून तरुणी पडल्या आणि त्यात चौघींचा बुडून मृत्यू झाला. 


किटवाड येथे लघुपाटबंधारे विभागाची दोन धरणे आहेत. एक क्रमांकाच्या धरणावर ही घटना घडली. या ठिकाणी धबधब्याचे पाणी पडून पुढे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या सुमारे 12 फूट खोल खड्ड्यात या तरुणी आंघोळीसाठी पाण्यात उतरल्या होत्या. पहिली तरुणी खड्ड्यात पडल्याने दुसरी तिला वाचवण्यासाठी गेली. त्यानंतर तिसरी वाचवण्यासाठी गेली, त्यानंतर चौथी असे करत एकापाठोपाठ पाच तरुणी त्या पाण्याच्या खड्ड्यात पडल्या आणि पाचही बुडाल्या. यामधील चारजणींचा जागीच मृत्यू झाला, तर एकीची प्रकृती गंभीर आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या