Maharashtra Strike : जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांसाठी सध्या राज्यातील शासकीय, निम-शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. यामध्ये शालेय शिक्षकांचाही समावेश आहे. शाळेतील शिक्षक संपावर गेल्याने शाळांमध्ये शुकशुकाट असून काही ठिकाणी शाळांना कुलूप लावण्यात आले आहे. शिक्षकांकडून दहावी आणि बारावी परीक्षा घेतल्या जात आहेत. मात्र, इतर वर्ग संपामुळे बंद आहेत. दोन वर्ष शाळा - महाविद्यालय बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी शाळा - कॉलेज सुरु झाल्यानंतर ऐन वार्षिक परीक्षा तोंडावर असताना शिक्षक संपावर गेलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य देखील टांगणीला लागले आहे.
जुन्या पेन्शनसाठी शिक्षक संपावर गेले आहेत. त्यामुळे शाळांना कुलूप लवण्याची वेळ आली आहे. शिक्षक संपावर गेल्याने बारामती तालुक्यातील 278 शाळांना कुलूप लावण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक नसल्याचे शाळा बंद आहेत. कोरोनामुळे शिक्षणात विद्यार्थी मागे पडले आहेत. त्यात शिक्षक अधिवेशनामुळे बारामतीमधील बहुतांश शाळा बंद होत्या. आता पुन्हा जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक संपावर गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील 735 माध्यमिक शाळा संपामुळे बंद आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाचे 9 हजार कर्मचारी संपात सहभागी आहेत. तर जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या 3569 शाळा सध्या बंद आहेत. प्राथमिक विभागाचे 11 हजार कर्मचारी संपात सहभागी आहेत. त्यामुळे शाळा बंद आहेत. त्यातच परीक्षेचा काळ असताना विद्यार्थ्यांची शाळा बुडत असल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1386 शाळा असून त्यात 3466 शिक्षक कार्यरत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचार्यांनी बेमुदत संप पुकारल्याने जिल्ह्यातील बहुतांश शाळा शिक्षक नसल्याने बंद ठेवाव्या लागल्या आहेत. सिंधुदुर्गात 3243 शिक्षक संपात सहभागी असल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे 1307 शाळा बंद आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर आहेत.
सोलापुरात जवळपास 5 हजार शिक्षक संपात सहभागी आहेत. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील 1093 शाळा बंद आहेत. धाराशीव जिल्ह्यातही संपाचा परिणाम जाणवत आहे. काही ठिकाणी अवघ्या एक-दोन शिक्षकांवर शाळा सुरू असल्याचे चित्र आहे.
जळगाव जिल्ह्यातील 560 माध्यमिक शाळा आणि 37 कॉलेज मधील बारा हजार शिक्षक आणि कर्मचारी संपात सहभागी आहेत. शाळा-कॉलेजला टाळे लागल्याने विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
चंद्रपूरमध्ये विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षकांच्या संपामुळे मेटाकुटीला आलेल्या विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांच्या मागणीसाठी चक्क रास्ता रोको केला. सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावातील ही घटना असून सकाळपासून विद्यार्थ्यांनी सिंदेवाही-नवरगाव रस्ता बंद केला. जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग पहिली ते सातवीच्या जवळपास 50 ते 60 मुलांनी हा रास्ता रोको केला होता. कोरोनामुळे आधीच आमचे दोन वर्ष वाया गेले आणि आता शिक्षकांच्या संपामुळे आमचं नुकसान होत आहे. त्यामुळे वर्गात शिक्षक आल्याशिवाय आम्ही उठणार नाही अशी विद्यार्थ्यांची भावना होती. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची माहिती मिळताच गटविकास अधिकारी आणि पोलीस तातडीने लाडबोरीकडे रवाना झाले आणि त्यांनी रास्ता रोको करणाऱ्या शाळकरी मुलांची समजूत काढली. गटविकास अधिकारी यांनी उद्यापासून दोन पर्यायी शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन अखेर शांत झाले.