मुंबई: राज्यभरात आज गणपती विसर्जनाचा (Ganesh Visarjan) उत्साह पाहायला मिळतोय. मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा, विदर्भात उत्साही मिरवणुका सुरू आहेत. अनेक मिरवणुकीत ढोल-ताशा, झांजपथकं, मर्दानी खेळांचं विशेष आकर्षण आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना आभाळही गहिवरून आल्याचं दिसतंय. अनेक ठिकाणी विसर्जनाच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली आहे.


मुंबई, पुण्यात तर प्रसिद्ध गणपतींची मिरवणूक सध्या जोरदार सुरु आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांच्या रस्त्यांवर सध्य़ा लाडक्या बाप्पाच्या मिरवणुकीचा उत्साह पाहायला मिळतोय. गिरगाव, जुहू चौपाटीवर सध्या गणपती विसर्जनाची लगबग सुरु आहे. इथं हळूहळू मोठ्या गणपती मूर्तींच्या आगमनाला सुरूवात झाली. तर पुण्यातही पाऊस सुरु असूनही बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून येतंय.


गेल्या दहा दिवसांपासून, मनामनात आणि चराचरात गणपती बाप्पाचाच नामघोष सुरू आहे. घरोघरी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं जात होतं. तर सार्वजनिक गणपतींचं दर्शन पाहण्यासाठीही भाविकांचे जत्थेच्या जत्थे उत्साहाने जमा होत होते. याच लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा आजचा दिवस... या निरोपाचा सोहळा पाहण्यासाठीही रस्तोरस्ती भरगच्च गर्दी जमलीय. 


Kolhapur Ganesh Visarjan : कोल्हापुरात मिरवणुकीला सुरूवात 


कोल्हापुरातील बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर गणेशमंडळ बाप्पाची मूर्ती घेऊन येण्यास सुरुवात झाली आहे. या मार्गावरच कोल्हापूर शहरातील मुख्य गणेश मंडळ सहभाग घेतात. बिनखांबी गणेश मंदिर इथून सुरू होणारी ही विसर्जन मिरवणूक महाद्वार रोडवरून गंगावेशच्या दिशेनं जाते. बाप्पाची ही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येनं हजेरी लावत असतात. अतिशय हळुवार पद्धतीने ही गणेश मंडळं बाप्पाची मूर्ती घेऊन जात असतात.


Nagpur Ganesh Visarjan : नागपुरात विसर्जनाचा उत्साह


नागपुरात हजारोंच्या संख्येने घरगुती गणपती मूर्तींचंही विसर्जन होत आहे. नागपूर शहरातील गांधीसागर, फुटाळा यासारख्या तलावांच्या काठावर तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी महानगरपालिकेने 300 पेक्षा जास्त कृत्रिम टॅंक उभारले आहे. सर्व घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन या कृत्रिम टॅंक मध्ये केलं जात आहे. तसेच ज्या मंडळाचे गणपती चार फुटापेक्षा कमी आकाराचे आहे त्यांचे विसर्जन ही कृत्रिम टॅंक मध्ये होत आहे. गांधीसागर तलावाजवळ उभारलेल्या कृत्रिम टॅंकमध्ये नागपूरकर मोठ्या संख्येने घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन करत आहेत. दहा दिवस बाप्पांची मनोभावे पूजा केल्यानंतर आरती करून भाविक बाप्पांना निरोप दिला जात आहे.


तुळशीबाग परिसरातून नागपूरचा राजाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली. आकर्षक अशा रथावर नागपूरचा राजा विराजमान होता. तुळशीबाग परिसर, ते कोराडीच्या दिशेने ही मिरवणूक पार पडली. विसर्जन मिरवणुकीत खास वैदर्भीय ढोलसह बँड पथक आकर्षण ठरलं.


Washim Ganesh Visarjan : वाशिममध्ये हरिद्वारहून कलाकार


वाशिममध्येही ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणूक सुरु झाली. मानाच्या अशा शिवशंकर गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला खासदार भावना गवळी उपस्थित होत्या. शिवाय विसर्जन मिरवणुकीत खास हरिद्वारमधून आलेल्या कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून वाशीमकरांचे लक्ष वेधून घेतले.


अकोल्यातही मोठ्या उत्साहात गणरायाला निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत सर्वपक्षीय नेते होते. सार्वजनिक गणेश मंडळांसोबत घरगुती गणपतीहीचं विसर्जन पार पडलं


बुलढाणा जिल्ह्यातील मानाच्या लाकडी गणपती मंडळाची मिरवणूक उत्साहात पार पडली. विसर्जन मिरवणुकीची सुरुवात लाकड गणपतीपासूनच होते. त्यानंतरच शहरातील इतर गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतात. ही पंरपरा यंदाही कायम राहिली.


Dhule Ganesh Visarjan : धुळे शहरात मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी


धुळे शहरातील मानाच्या खुनी गणपतीचे जुने धुळे भागातील खुनी मज्जिद जवळ मुस्लिम धर्मीय बांधवांकडून पुष्पवृष्टी करून तसेच आरती करून स्वागत करण्यात आले. गेल्या 128 वर्षांची ही परंपरा आजही कायम असून दरवर्षी ही मिरवणूक मस्जिदजवळ आल्यानंतर या ठिकाणी मुस्लिम धर्मीय बांधवांकडून गणरायाचे याठिकाणी स्वागत केले जाते. हे स्वागत झाल्यानंतर थोड्याच वेळात खुनी गणपतीचे विसर्जन होणार आहे.


ही बातमी वाचा: