Naseem Khan injured in car accident at Nanded : महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री आरिफ नसीम खान (Naseem Khan Congress) यांच्या गाडीला नांदेडमध्ये (Nanded News) अपघात झाल्याचं समोर आलं आहे. अपघातात नसीम खान यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. भारत जोडो यात्रेसाठी (Bharat Jodo) नसीम खान हे हैद्राबादहून नांदेडला येत होते. नसीम खान यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. ते हैदराबादहून नांदेडच्या दिशेने 7 तारखेला पोहोचत असलेल्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी निघाले होते.
 
नसीम खान हे नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेचे प्रभारी असून नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेचे संपूर्ण व्यवस्थापन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत करत आहेत.  या अपघाताचं वृत्त समजताच ज्येष्ठ नेते एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात व इतर ज्येष्ठ नेत्यांनी फोन करून त्यांची विचारपूस केली आहे.
 
अपघातानंतर नसीम खान यांनी म्हटलं आहे की, "माझ्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून, मी सुखरूप आहे. भारत जोडो यात्रेचे प्रभारी म्हणून माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी मी उत्सुक आहे. मी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या 3 बैठका पूर्ण केल्या आहेत. आम्ही नांदेडला पोहोचलो आहोत. मला खूप आनंद वाटतो की नांदेड जिल्ह्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत ऊर्जेने आणि प्रेमाने स्वागत होईल.
 
नांदेडमधील भिलोली टोल प्लाझा येथे एका कारची आणि नसीम खान प्रवास करत असलेल्या कारची धडक बसली.  अपघात इतका जोरदार होता की दोन्ही गाड्या चक्काचूर झाल्या आहेत. या घटनेत नसीम खानसह गाडीचा चालक जखमी झाला.
 
घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत आरिफ नसीम खान आणि इतरांना प्रथमोपचार किट देऊन मदत केली. बिलोली काँग्रेसच्या एका पक्षाच्या कार्यकर्त्याने बिलोली वाहतूक पोलिस ठाण्यात पोलिस तक्रार दाखल केली आहे.