Maharashtra Flood | आलमट्टी धरणातून नेमका किती विसर्ग सुरु?
एबीपी माझा वेब टीम | 09 Aug 2019 03:41 PM (IST)
मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही आलमट्टी धरणातून तेवढा विसर्ग झाला नाही. मात्र जोपर्यंत विसर्ग वाढवणार नाही तोपर्यंत सांगलीचा पूर ओसरणार नाही, हे देखील खरं आहे.
मुंबई : राज्यात विशेषत: कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलमट्टी धरणाच्या फुगवट्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असं म्हटलं जात आहे. यानंतर आलमट्टी धरणातून पाणी सोडण्यासाठी कर्नाटक सरकारने मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. धरणातून पाच लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग होईल, असं म्हटलं जात होतं. परंतु कर्नाटक सरकारने ही मागणी धुडकावल्याचं कळतं. कारण धरणातून तेवढा विसर्ग झालाच नसल्याची माहिती धरणाच्या अधिकृत वेबसाईटवर दिसत आहे. तर त्याउलट आलमट्टीमधून साडेचार लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीटद्वारे केला आहे. त्यामुळे आलमट्टी धरणातून नेमका किती पाण्याचा विसर्ग झाला हेच स्पष्ट होत नाही. कृष्णा भाग्य जल निगम लिमिटेडच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार, "आज सकाळी 10 वाजता आलमट्टी धरणात 3 लाख 49 हजार 526 क्युसेक पाण्याची आवक सुरु होती आणि 3 लाख 64 हजार 52 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. म्हणजेच जेवढं पाणी धरणात येतंय, जवळपास तेवढ्याच पाण्याचा विसर्ग होत आहे." त्यामुळे सांगलीमधील परिस्थिती जै थेच आहे. सांगलीतील पूर ओसरण्यासाठी आणखी जास्त पाण्याचा विसर्ग होण्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 5 लाख क्युसेक पाणी विसर्ग करण्याची विनंती कर्नाटक सरकारला केली होती. तर दुसरकडे मुख्यमंत्री कार्यालयाने आलमट्टी धरणातून साडेचार लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याचा दावा केला आहे. सीएमओच्या ट्वीटनुसार, आलमट्टी धरणातून सकाळी 10 वाजता 4 लाख 30 हजार 352 क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला आहे (धरणात येणाऱ्या पाण्यापेक्षा 50 हजार क्युसेक जास्त). आता हा विसर्ग वाढून 4 लाख 50 हजार क्युसेक झाला आहे. वेबसाईट आणि सीएमओचं ट्वीटमध्ये आलमट्टी धरणातून सकाळी दहा वाजता सोडलेल्या पाण्याची आकडेवारी वेगवेगळी आहे. त्यामुळे आज सकाळी आलमट्टी धरणातून नेमका किती पाण्याचा विसर्ग झाला, हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही तेवढा विसर्ग झाला नाही. मात्र जोपर्यंत विसर्ग वाढवणार नाही तोपर्यंत सांगलीचा पूर ओसरणार नाही, हे देखील खरं आहे.