कोल्हापूर : एकीकडे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे हजारो लोकांच्या डोळ्यातलं पाणी सुकलं नाही, पण त्याचवेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन पूर पर्यटनात मग्न असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहेत. कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेले गिरीश महाजन सेल्फी व्हिडीओला हसून दाद देताना दिसत आहे. त्यामुळे हजारो-लाखो लोक पुरात अडकले असताना मंत्री आनंदात आहेत का असा प्रश्न उपस्थित होत.

कोल्हापुरातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गिरीश महाजन गुरुवारी (8 ऑगस्ट) बोटी निघाले होते. यावेळी एका कार्यकर्त्याने काढलेल्या सेल्फी व्हिडीओमध्ये गिरीश महाजन हसून दाद देताना दिसत आहेत. खरंतर मंत्री, इथे पोहोचले आहेत, हे सांगण्यासाठी कार्यकर्ते सेल्फी व्हिडीओ तसंच फोटो काढताना दिसत होते. महाजन यांनी मदतकार्यही केलं. परंतु अशाच एका व्हिडीओमध्ये गिरीश महाजन हसून दाद देताना दिसत आहेत. त्यामुळे किमान परिस्थितीचं गांभीर्य राखण्याचं भान कोणालाही राहिलं नव्हतं.



विरोधकांचा गिरीश महाजन यांच्यावर निशाणा

दरम्यान गिरीश महाजन यांच्या असंवेदनशीलतेचा विरोधकांनी खरपूस समाचार घेतला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.

धनंजय मुंडे यांनी ट्वीट केलं आहे की, "सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय. लेकराच्या मृतदेहाचे चित्र आठवले तर मनाला चटका लागून डोळ्यात टचकन पाणी येतं. मंत्री महोदय मात्र सेल्फीत मग्न आहेत. लाज कशी वाटतं नाही? या असंवेदनशील वागण्याची दखल घेणार का?"


जयंत पाटील म्हणाले की, "नुकसान झालं असताना मंत्री हसत, खिदळत असतील तर ते आपलं दुर्दैव आहे. सत्तेत असलेल्या लोकांना काय शहाणपण शिकवायचं. आजही इथे पालकमंत्री आलेले नाहीत. सरकारने मदतीचा हात दिलेलाही दिसत नाही. ढिसाळ कारभाराला लोक वैतागले आहेत. मदत करण्याऐवजी असं फिरुन स्वत:ची जाहिरात करणं दुर्दैव आहे."

"मुख्यमंत्र्या आपले विश्वासू सहकारी पाठवण्याऐवजी काही कार्यक्षम मंत्री पाठवायला हवे होते. कारण हा विषय आमदार पळवण्याचा नाही. ज्याप्रमाणे रोड शो करत त्याप्रमाणे नवी वॉटर शो करण्याची पद्धत मंत्रीमहोदयांनी सुरु केली आहे. डिझास्टर टूरिजमची नवी व्याख्या त्यांनी तयार केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काही सीरिअस मंत्री आहेत, त्यांना या कामात पाठवायला हवं होतं," अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी गिरीश महाजन यांना लक्ष्य केलं.

असंवेदनशीलतेचा कळस...२५ पेक्षा जास्त लोकं मृत्युमुखी, हजारो विस्थापीत व अब्जो रुपयांचे नुकसान झाल्यावरही तुम्हाला नाचायला व हसायला सुचतंच कसं?, असा प्रश्न महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी विचारला आहे.