छ. संभाजीनगर - राज्यात यंदा पाऊसकाळ अतिशय कमी झाल्याने दुष्काळसदृश्य (Drought) परिस्थिती आहे. त्यामुळेच, सरकारनेही अनेक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला. त्यामध्ये, अवर्षणग्रस्त असलेल्या मराठावाड्यातील काही जिल्ह्यांचाही समावेश आहे. 31 ऑक्टोबर 2023 रोजी निघालेल्या शासन निर्णयानुसार 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर, तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलाआहे. त्यातच, उन्हाळ्याची (Summer) सुरुवात झाल्यानंतर सर्वत्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांसाठीही पाणी व चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे, शासनाने आता चारा छावणीला (Chara Chawani) सुरुवात केली असून मराठवाड्यातील पहिली चारा छावणी गंगापूरमधून सुरू करण्यात आली आहे.  


महाराष्ट्रात यंदा सर्वांचाच पाऊस पाण्याचा अंदाज फेल गेला, तर पाऊसाने पाठ फिरवल्याने शेतकरीही चिंताग्रस्त दिसून आला. पावसाअभावाी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने होती होती. विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा ऐरवणीवर होता. त्यानंतर, सरकारने 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य शासन निर्णयानुसार, “जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दुरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करून 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये, गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे.” दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या 40 तालुक्यांमध्ये काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. तर, जनावरांसाठी चारा छावण्याही सुरू करण्यात येत आहेत.


यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाडा पुन्हा एकदा चारा छावण्यांकडे वळाल्याचं दिसून आलं. मराठवाड्यातली पहिली चारा छावणी गंगापूरमध्ये सुरू करण्यात आली. त्यामुळे, मराठवाड्याचा प्रवास पुन्हा टँकरवाडा ते चारा छावणी पर्यंत सुरू झाला आहे. छत्रपती संभाजी संभाजीनगर च्या गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी येथे मराठवाड्यातील पहिली चारा छावणी प्रशांत बंब यांनी स्वखर्चाने सुरू केली आहे.पहिल्याच दिवशी या चारा छावणीत 700 जनावरांची नोंद करण्यात आली. शेतकऱ्यांच्या जनावरांना इथं मुबलक चारा पाणी देण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरच एक मोठं संकट कमी करण्यात बंब यांची मदत मोलाची आहे. एकीकडे राजकारणी प्रचारामध्ये व्यस्त असताना दुसरीकडे बंब यांनी सुरू केलेल्या चारा छावणीचा आदर्श सध्या इतरांनी घेण्याची ही गरज असल्याचं छावणीतील शेतकऱ्यांमधील चर्चेतून पुढे आले. 


चारा छावण्यांमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतो, तर मुक्या जनावरांना हक्काचा चारा व पाणी दिले जाते. त्यामुळे, शेतकरी बांधव आपल्याकडील जनावरांना उन्हाळ्याच्या हंगामात चारा छावण्यांमध्ये आणून सोडतात. शेतातील पिकांची कापणी व काढणी झाल्यामुळे जमिन ओसाड असते. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईही जावणते. या परिस्थितीत चारा छावण्यांचा मोठा दिलासा बळीराजा व जनावरांना असतो.