Maharashtra Drought News Updates : मुंबई : एकीकडे देशभराती मान्सूपूर्व पाऊस (Pre-Monsoon Rains) पडतोय, तर दुसरीकडे महाराष्ट्र (Maharashtra News) मात्र, भीषण पाणीटंचाईला सामोरा जातोय. राज्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करावी लागतेय. वाशिममध्ये महिलांना पाण्यासाठी मैलोंमैल वणवण करावी लागतेय. तर परभणीत अक्षरक्ष: जमिनीला भेगा पडल्यात. संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येतोय. नंदुरबारमध्येही अनेक गाव दुष्काळाच्या (Maharashtra Drought) छायेत आहेत. एवढंच नाहीतर अनेक भागांत विहिरींनी तळ गाठल्याचं चित्र आहे. शेतकरी तर मान्सूनची वाट पाहत आभाळाकडे डोळे लावून बसलेत. 


वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात पाणीटंचाई कायम


वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ इथल्या नागरिकांवर दर उन्हाळ्यात येते. तसेच, खैरखेडा गावात डोंगरकड्यांवरून एक किलोमीटरची पायपीट करून खैरखेड्यातील नागरिकांना पाण्याची तहान भागवावी लागत आहे. पाचवीला पुजलेलं पाणी टंचाईचं संकट केव्हा दूर होणार? असा प्रश्न खैरखेड्यातील नागरिकांना पडला आहे. 


पाण्याचं दुर्भिक्ष आणि आर्थिक झळा; लातूरकर हैराण 


देशातलं एकमेवं शहर जिथं एकेकाळी रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागलं. ते म्हणजे लातूर शहर. याच शहरात उन्हाळ्यात पाण्याची समस्या मात्र अधिकच जाणवते. दुष्काळात पाण्यासाठी होणाऱ्या खर्चाच्या झळा लातूरकरांना सहन कराव्या लागत आहेत. लातूरमधील सहारा क्लासिक हाउसिंग सोसायटीमध्ये 26 कुटुंब राहतात. दररोज सातशे रुपये टँकरप्रमाणे तीन ते चार टँकर पाणी त्यांना विकत घ्यावं लागत आहे. पिण्याचं पाणी दहा रुपयांपासून 20 रुपये चार प्रमाणे विकतच तर घ्यावंच लागतं. हे प्रत्येक टँकर चालक दिवसाला किमान पाच फेऱ्या तरी करत असतात. शहरात सुरू असलेल्या अनेक बांधकामांनाही विकतच पाणी घ्यावं, लागण्याची वेळ आली आहे. यातून दररोज लाखोंची उलाढाल होत असते. तसंच ग्रामीण भागातही पाण्यापासून नागरिकांना वंचित रहावं लागतंय. 


पाण्याअभावी यंदा द्राक्ष हंगाम वाया जाण्याची शक्यता 


दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी हे गाव बेदाणा निर्मितीसाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्यासाठी निंबर्गी या एकट्या गावात सुमारे 2 हजार एकर क्षेत्रावर द्राक्ष लागवड केली जाते. यंदाच्या वर्षी पाणी जाणवत असल्याने इथले शेतकरी छाटणी घ्यायला तयार नाहीत. यामुळे यंदाचे वर्षातील द्राक्ष हंगाम  वाया जाण्याची शक्यता आहे.