Maharashtra Din 2022 : मराठी माणसासाठी महाराष्ट्र दिनाचा (Maharashtra Divas) उत्साह खूप मोठा असतो. महाराष्ट्राचा इतिहास सांगणारे विविध कार्यक्रम, परंपरा दर्शवणाऱ्या मिरवणुका अशा सरकारी आणि खाजगी कार्यक्रमांनी या दिनाचा सोहळा साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या खाकी स्टुडिओने महाराष्ट्राला एक खास भेट दिली आहे. मुंबई पोलिसांकडून अंगावर रोमांच उभी करणारी सप्तसुरांची अनोखी सांगितिक भेट म्हणजे नागरिकांसाठी एक पर्वणीच ठरत आहे.
महाराष्ट्राचा गौरव करणारी सांगितिक वंदना
१ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राचा गौरव करणारी खाकी स्टुडिओकडून सांगितिक वंदना देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या खाकी स्टुडिओने अंगावर रोमांच उभी करणारी सप्तसुरांची अनोखी सांगितिक भेट देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र दिनाचा उत्साह कोरोनामुळं अनुभवता आला नव्हता. यंदा मात्र कोरोनाचे निर्बंध नसल्यानं महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होणार आहे. कोरोनाच्या काळात महाराष्ट्र पोलिस कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अहोरात्र काम करताना दिसले. वेळप्रसंगी ते स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करताना दिसले. कोरोना विरुद्ध आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी त्याचप्रमाणे पोलिस फ्रंट लाईनवर लढत होते. परंतु या योद्धांमध्येच कोरोना संसर्ग वाढत होता, त्यात लक्षणीय बाब म्हणजे पोलिसांची संख्या सर्वाधिक दिसली होती.
राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 107 हुतात्म्यांचे स्मरण
1 मे 1960 रोजी अनेक राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र राज्य स्थापन केले गेले. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. शिवाय हा दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिनी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 107 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. त्यांना मानवंदना देण्यासाठी ही अनोखी भेट मुंबई पोलिसांकडून सादर करण्यात आली आहे.
काय आहे महाराष्ट्र दिनाचा इतिहास
21 नोव्हेंबर इ.स.1956 दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 107 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली