Sushilkumar Shinde Majha Katta : माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मैत्रीत माणूस कसा फसतो याचा एक मजेदार किस्सा सागितला. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या संदर्भातील हा किस्सा आहे. विलासराव देशमुख आणि सुशिलकुमार शिंदे या दोघांची चांगली मैत्री होती. त्यांना दो हंसो हा जोडा असं देखील म्हटलं जात होते. ज्यावेळी सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते, त्यावेळी विलासराव देशमुखांनी त्यांनी एका पत्रावर सही करायला सांगितले होते. त्यावेळी शिंदे यांनी ते पत्र न वाचता सही केली. मात्र, त्यानंतर मी फसलो असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
नेमकं घडलं काय होतं?
शरद पवार हे ज्यावेळेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी काही लोकांनी पवार यांच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात काही जणांनी एक पत्र दिल्लीला दिले होते. त्यावेळी ते पत्र घेऊन विलासराव देशमुख माझ्याकडे आले होते. त्यावेळी विलासराव देशमुख यांनी मला त्या पत्रावर सही करायला सांगितले. मी देखील न वाचताच त्या पत्रावर सही केली. त्यानंतर मला कळाले की त्या पत्रामध्ये शरद पवार यांना मुख्यमंत्रीपदावरुन काढावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी मी महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होतो. मैत्रीत माणूस कसा फसतो याचा त्यावेळी मला अनुभव आला. पण त्यावेळी माझी चूक झाल्याचे सुशिलकुमार शिंदे यांनी सांगितले. असा किस्सा शिंदे यांनी सांगितला.
एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात आला. यावेळी सुशिलकुमार शिंदे आणि त्यांची पत्नी उज्वला शिंदे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला.
सुशिलकुमार शिंदे यांचा स्वभाव मवाळ आहे. त्यांनी कधी आक्रमक भूमिका घेतली नाही. ते पदासाठी कधीही आग्रही नसतात असे उज्वला शिंदे यांनी सांगितले. आता त्यांनी थोडेसे निवांत बसावे. त्यांनी राजकारणात जास्त पुढाकार घेऊ नये असे मला वाटते असेही उज्वला शिंदे म्हणाल्या. घरामध्ये लक्ष देण्याचे त्यांना आणखी जमत नसल्याचे उज्वला शिंदे म्हणाल्या. आता ते कुटुंबाच्या जवळ आले आहेत. ज्यावेळी त्यांना दोन वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी आली पण ते झाले नाहीत. त्यावेळी त्यांनी पक्षातील नेत्यांना बोलावे असे मला वाटत होते असे उज्वला शिंदे म्हणाल्या. मात्र, सोनिया गांधी यांनी त्यांना मुख्यमंत्री करण्याचे ठरवले होते असे त्या म्हणाल्या.