मुंबई: गृहविभागावर मुख्यमंत्री नाराज नाहीत, त्यांनी स्वत: त्याबद्दल खुलासा केला आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणार असून जर गृहखात्याकडून काही कमतरता असेल तर त्यावर सुधारणा केली जाईल असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले. गेले काही दिवस मुख्यमंत्री तसेच महाविकास आघाडीतले अनेक नेते गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली होती. त्यानंतर गृहमंत्री वळसे-पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. 


दिलीप वळसे पाटील माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, "गृहमंत्रालयावर मुख्यमंत्री नाराज नाहीत. राज्य सरकारमध्ये परस्परांना विश्वासात घेऊन काम केलं जातंय. संजय राऊत यांची भावना बरोबर आहे. आमच्या विभागातून काही कमतरता असेल तर त्यामध्ये सुधारणा केली जाईल."


ती बैठक पूर्वनियोजित
दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आज गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर ही बैठक झाल्याची चर्चा सुरू होती. त्यावर स्पष्टीकरण देताना गृहमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांचा 112  प्रकल्पाचा शुभारंभ उद्यापासून केला जात आहे. त्यासंबंधीच्या नियोजनासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. 


काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी असेल तर त्या संदर्भात अहवाल आल्यानंतर वक्तव्य करेन असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. संध्याकाळी पुन्हा एकदा आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 


गृहखातं भाजपबद्दल 'सॉफ्ट' असल्यानं शिवसेनेची नाराजी
दरम्यान, गृहखात्याने अधिक सक्षम आणि कठोर होणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा घुसतात. हे खरंतर गृह खात्यावरचं आक्रमण आहे असं शिवसेना संजय राऊत म्हणाले होते. गृहखातं भाजपबद्दल सॉफ्ट असल्यानं शिवसेनेमध्ये तीव्र नाराजी असल्याची माहिती मिळाली होती. भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्यात गृहखातं कमी पडत असल्याची शिवसेनेची भावना आहे. प्रवीण दरेकर आणि किरीट सोमय्या प्रकरणात कारवाई न झाल्यानं शिवसेनेची नाराजी असल्याचं बोललं जात होतं. 


मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज असल्याच्या वृत्ताचं स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते उत्तम काम करीत आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


संबंधित बातम्या: