Devendra Fadnavis: सर्वोच्च न्यायलयाच्या निकालानंतर (Supreme Court Verdict) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) पुरत समजले आहे की महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे. पण आपल्या कार्यकर्त्यांना पोपट जिवंत आहे हा संदेश देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलावं लागत असल्याची टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. फडणवीस यांनी म्हटले की, 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत मी काहीच बोलू शकत नाही. हे संपूर्ण प्रकरण आता विधानसभा अध्यक्षांकडे आहे. त्यांच्याकडे त्याची सुनावणी होणार आहे. जो काही निर्णय द्यायचा आहे तो निर्णय विधानसभा देतील. मात्र एक अभ्यासक म्हणून, एक वकील म्हणून आणि 25 वर्ष विधानसभेत काम केले म्हणून मी मला असे वाटते की आता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पुरत समजले आहे की महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे. पण आपल्या कार्यकर्त्यांना पोपट जिवंत आहे हा संदेश देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलावं लागत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. वज्रमुठीला आधीच तडे गेलेले आहेत आणि कोणी कसे बसायचे कोणी कुठे उभे राहायचे कोणी बोलायचं यामध्ये वाद सुरू आहेत. हा नेत्यांच्या बद्दल पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिलेला आहे. त्यामुळे आम्ही विरोधक आहोत त्याबद्दल बोलण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कधी ?
फडणवीस यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होणार नाहीत. लोकसभेच्या निवडणुका या लोकसभेच्या वेळीच होतील. तर, विधानसभेच्या निवडणुका विधानसभेचा कार्यकाळ झाल्यानंतर होतील. लोकसभेच्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रचंड मतांनी निवडून येऊ. त्यानंतर अधिकच काम करून आम्ही विधानसभेमध्ये निवडणुका जिंकू असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
महापालिका निवडणुकांचं काय ?
महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जुलै महिन्यामध्ये सुनावणी पूर्ण होईल आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये निकाल येईल. ऑक्टोबरमध्ये निवडणूक होतील असा अंदाज मी व्यक्त केलेला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. याआधी भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले.
फक्त बारामती नाही तर 48 लोकसभा मतदारसंघावर लक्ष
बारामती लोकसभा मतदारसंघावर पत्रकारांच जास्त लक्ष असतं. आम्हाला आम्ही पूर्ण 48 लोकसभा मतदारसंघावर लक्ष देत आहोत तेथे केंद्रीय नेत्यांचे सातत्याने दौरे होत आहेत. बारामती त्यापेक्षा काही वेगळे नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. जिल्हा विभाजनाच्या अनेक मागण्या आमच्यापुढे आहेत. त्यामुळे एखाद्या जिल्ह्याचा विचार करता येणार नाही सर्व जिल्ह्यांचा एकच विचार करावा लागेल असेही त्यांनी म्हटले.