Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एका महिलेनं एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात प्रतिक्रिया दिली आहे. मला अडचणीत आणण्यासाठी हा ट्रॅप होता असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.


वेगवेगळ्या माध्यमातून त्या मुलीने विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला


अमृता फडणवीस यांच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही कामे करण्यासाठी प्रयत्न झाला आहे. पहिल्यांदा पैशांची ऑफर देण्यात आली. त्यानंतर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनिल जयसिंगानी नावाचा एक व्यक्ती आहे. जो गेल्या सात ते आठ वर्षापासून फरार आहे. त्या व्यक्तिवर 14 ते 15 गुन्हे आहेत. अनिल जयसिंगानी यांची एक मुलगी आहे. ही मुलगी 2015-16 च्या दरम्यान अमृता फडणवीसला भेट होती. त्यानंतर तिचे भेटणे बंद झाले होते. मात्र, अचानक पुन्हा 2021 नंतर या मुलीने माझी पत्नी अमृता फडणवीस यांना भेटायला सुरु केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या मुलीने मी डिझायनर आहे, माझा व्यवसाय सुरु असल्याचे सांगितले. तसेच प्रभावशाली 50 महिल्यांच्या यादीत माझं नाव आल्याचे  त्या मुलीने सांगितले. तसेच आईवर लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन देखील त्या मुलीने अमृता फडणवीस यांच्याकडून करुन घेतल्याचे फडणवीस म्हणाले. या माध्यमातून त्या डिझायनर असलेल्या मुलीने आत्मविश्वास संपादन केल्याचे फडणवीस म्हणाले. त्यानंतर त्या मुलीने येणं जाणं सुरु केलं. 


वडील काही बुकीजला ओळखत असल्याची माहिती त्या मुलीने दिली


काही काळानंतर या मुलीने तिने डिझाईन केलेले कपडे वापरण्याची विनंती देखील अमृता फडणवीस यांनी केली. त्यातून तिने विश्वास संपादन केला. त्यानंतर तिने एक दिवस सांगितले की, माझ्या वडिलांना चुकीच्या केसेसमध्ये अडकवण्यात आलं आहे. तर तुम्ही त्यांना त्यातून सोडवा असे त्या मुलीने अमृता फडणवीस यांना सांगितलं. या गोष्टी तिने राज्यातील सरकार बदलल्यानंतर सांगितले. त्यानंतर माझ्या पत्नीने त्या मुलीला तुझे काही निवेदन असेल तर ते मला देण्यास सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. त्यानंतर त्या मुलीने माझे वडील काही बुकीजला ओळखतात. ते बुकीजला माहिती देत होते. यामध्ये रेड पडायच्या आणि यातून आम्हाला दोन्हीकडून पैसे मिळायचे असेही त्या मुलीने अमृता फडणवीस यांना सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. यामध्ये जर तुम्ही मदत केली तर आपणही अशा रेड कंडक्ट करु असे त्या मुलीने अमृता फडणवीस यांना सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी अमृता फडणवीस यांनी हे आमचं काम नसल्याचे सांगत अशा गोष्टीशी आमच्याशी करायच्या नाहीत असे सांगितले. 


वडिलांना सोडवण्यासाठी मुलीने एक कोटींची ऑपर केली होती


दरम्यान, काही काळानंतर डिझायनर असलेल्या त्या मुलीने तिच्या वडिलांना सोडवण्यासाठी एक कोटी रुपये देण्याची ऑफर केली. माझ्या वडिलांना सोडून द्या असे अमृता फडणवीस यांना सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी अमृता फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की, ते चुकीच्या पद्धतीने अडकले असतील तर त्यांना सोडवता येईल. याबाबत मला काही सांगू नको असे अमृता फडणवीस यांनी सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. बुकीजच्या विषयानंतर अमृता फडणवीस यांनी त्या मुलीला फोनवर ब्लॉक केलं. त्यानंतर काही दिवसांनी अनोळखी नंबरवरुन काही व्हिडीओज, काही क्लिप आल्या. त्या उघडल्या. यामध्ये अमृता फडणवीस आणि त्या मुलीचे झालेले संभाषण होते. मात्र, त्यात गंभीर काहीच नव्हते असे फडणवीस म्हणाले. यामध्ये काही व्हिडीओ आले होते. यामधील काही व्हिडीओमध्ये ती हार घालत होती, काहीमध्ये अंगठी घालत होती, यामध्ये ते परत केल्याचेही दिसत आहे. यामध्ये एक गंभीर व्हिडीओ असा दिसला की एक बॅग आहे, त्यामध्ये ती पैसे भरत असल्याचे दाखवण्यात आले. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये तशीच बॅग ती मुलगी आमच्या घरी काम करणाऱ्या बाईला देते. असे व्हिडीओ पाठवत एका व्यक्तीने धमकी दिल्याचे फडणवीस म्हणाले. हे जर व्हिडीओ टाकले तर तुमच्या नवऱ्याची नोकरी जाईल. माझे सगळ्या पक्षाशी संबध आहेत. त्यामुळे तुम्ही आम्हाला तात्काळ मदत करा. आमच्या सगळ्या केसेस क्लिअर करा असे अमृता फडणवीस यांना सांगण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला 


या प्रकारानंतर लगेच आम्ही पोलिसांना सांगितले. त्याचा एफआयआर करुन घेतल्याचे फडणवीस म्हणाले. त्या सगळ्या व्हिडीओची तपासणी करण्यात आली. यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे समोर आल्याचे फडणवीस म्हणाले. त्यानंतर त्या मुलीने सर्व गुन्हे परत घ्यायचे होते म्हणून हे सगळं मी केल्याचे सांगितले. बोलता बोलता त्या मुलीने काही नेत्यांची काही पोलिसांचीही नावे घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मागील सीपींच्या काळात आमच्या केसेस परत घेण्याची कारवाई सुरु झाली होती. पण तुमचे सरकार आल्यावर ती कारवाई थांबल्याचे त्या मुलीने सांगितले. यावेळी तिने काही जणांची नावे घेतली. आम्हाला हे सगळं करायला सांगण्यात आल्याची हिंट दिली होती असंही त्या मुलीने सांगितलं. त्या मुलीने दिलेल्या हिंटप्रमाणे असे दिसते की मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यापूर्वीही मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता असे फडणवीस म्हणाले. काही लोक मला सांगायचे की तुमच्या कुटुंबाला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, ईश्वराची कृपा यासंदर्भातील सगळे पुरावे हाती आले आहेत. तो व्यक्ती जर पोलिसांच्या हाती आला तर या पाठीमागे कोण आहे ते समजेल असे फडणवीस म्हणाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक मोठ्या नेत्यांसोबत त्या व्यक्तीचे संभाषण असल्याचे फडणवीस म्हणाले. दरम्यान, यासंदर्भात पोलिस तपास करत आहेत. त्या व्यक्तीला पोलीस शोधत आहेत. तो सापडेल, त्याच्यावर कारवाई होईल, पण राजकारणामध्ये कुठल्या पातळीवर चाललो आहोत, याचा विचार आपल्याला करावा लागेल असेही फडणवीस म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न; डिझायनरविरोधात गुन्हा दाखल