Maharashtra Dam water Update: राज्यात सध्या घाटमाथ्यासह बहुतांश ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावलीय. मुसळधार पावसानं ओढे, नाले, झरे ओसंडून वाहतायत. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून धरणसाठ्यातही वाढ होताना दिसतेय. राज्यातील अनेक धरणे आता फुल्ल झाली आहेत, तर काही धरणांमध्ये वेगवेगळ्या धरणांच्या विसर्गाने, पावसाने वाढ होतानाचे चित्र आहे. मागील काही दिवसांच्या पावसाने अनेक नद्यांना पूरसदृश्य स्थिती आली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, जलसंपदा विभागानं राज्यातील धरणांचा उपयुक्त पाणीसाठा किती झालाय? कोणत्या धरणांमधून विसर्ग सुरु आहे, याबाबत आजचा अहवाल सादर केलाय.


अधिकृत माहितीनुसार, राज्यातील लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये 75.09 टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 11.85 टक्के अधिक पाणीसाठा झालाय. 


कोणत्या विभागात किती टक्के पाणीसाठा?



  • कोकण विभागातील एकूण 173 धरणांमध्ये 3586 दलघमी पाणीसाठा झाला असून कोकणातील धरणे 92.24 टक्के भरली आहेत.

  • पुणे विभागातील एकूण 720 धरणांमध्ये 88.15 टक्के पाणीसाठा झाला असून 16556 दलघमी पाणीसाठा या विभागात आहे. मागील वर्षी 69.79 टक्के पाणीसाठा झाल्यानं पुणेकरांची तहान भागणार आहे.

  • नाशिक विभागातील 537 धरणांमध्ये 72.82 टक्के पाणीसाठा झालाय. मागील दोन दिवसांत झालेल्या पावसानं नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणांमध्ये मोठा पाणीसाठा आल्याचे सांगण्यात येतंय.

  • मराठवाडा विभागातील 920 धरणांमध्ये 39.70 टक्के पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षीच्या तुलनेत 31.48 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यात मागील काही दिवसात झालेल्या पावसाने वाढ झाली असून मराठवाड्यातील धरणे भरत असल्याचे चित्र आहे.

  • नागपूरच्या एकूण  383 धरणांमध्ये 80.37 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षाच्या तुलनेत साधारण 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

  • अमरावती विभागातील धरणे आता 70.82 टक्के भरली आहेत. एकूण 264 धरणांमध्ये 3453 दलघमी पाणीसाठा झाला आहे. मागील काही दिवसांपासून विदर्भात मोठा पाऊस होत असल्यानं धरणसाठ्यात वाढ झाली आहे.


कोणती धरणे फुल्ल? कुठून सुरु विसर्ग?



  • सध्या कोकणातील बहुतांश धरणे फुल्ल झाली असून बहुतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ठाण्यातील बारावी धरण 100 टक्के भरले असून तानसा 98. 68% मोडक सागर 99.97% भातसा 94.73% भरलं. सध्या भातसा, सूर्या, वैतरणा व तिलारी नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

  • नाशिक, नगरच्या धरणांमध्ये ही पाणीसाठ्यात मोठी वाढ दिसून आली आहे. नाशिक विभागातील बहुतांश धरणांमधून सध्या मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मराठवाड्यातील धरणांवरही त्याचा परिणाम होत आहे. सध्या दारणा, गोदावरी, प्रवरा, गिरणा, तापी व वाघुर नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत आहे. 

  • पुणे विभागात जोरदार पाऊस झाल्यानंतर आता बहुतांश धरणे भरत आली आहेत. नीरा देवघर, भाटकर, वीर धरणे १००% भरली आहेत. बहुतांश धरणांमधील पाणीसाठा हा 90 टक्क्यांच्या वर गेल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून दिसते. सध्या घोड, मुळा,मुठा, भीमा, निरा, कृष्णा, वारणा, दूधगंगा व भोगावती नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होतोय.


हेही वाचा:


Girna Dam : गिरणा धरण फुल्ल होण्याचा मार्गावर, कुठल्याही क्षणी विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा