Coronavirus Updates Maharashtra : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची (Coronavirus Updates) संख्या वाढू लागली आहे. राज्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली असल्याचे चित्र आहे. राज्यात आज 803 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, तीन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
आज, गुरुवारी 6 एप्रिल रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात 803 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 3987 सक्रीय कोरोनाबाधित आहेत.
राज्यात रुग्ण चाचणीतला पॉझिटिव्ही दर हा चार आठवड्यांआधी 1.91 टक्के इतका होता. तर, मागील आठवड्यात (29 मार्च ते 4 एप्रिल 2023) हा दर वाढून 7.35 टक्के इतका झाला आहे.
पॉझिटिव्हीटीमध्ये वाढ होत असलेल्या जिल्ह्यात सोलापूर अग्रस्थानी आहे. सोलापूरमध्ये रुग्ण पॉझिटिव्हीटीचा दर हा 14.3 टक्के इतका आहे. तर, मुंबईत पॉझिटिव्हीटी दर 12.8 टक्के इतका आहे. नागपूरमध्ये 13 टक्के, अकोल्यामध्ये 12.3 टक्के, पुण्यात 12.9 टक्के, रायगडमध्ये 11.9 टक्के इतका दर आहे.
या जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ
मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नागपूर, नाशिक, पालघर आणि सोलापूर या जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.
मुंबईत आज सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद
मुंबई महापालिका हद्दीत आज 216 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यातील 19 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनामुळे आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
ठाणे महापालिका हद्दीत 48 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, एका बाधिताचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका हद्दीत 27 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. पुणे महापालिका हद्दीत 80 कोरोनाबाधित, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 24. सांगलीमध्ये 20, पालघरमध्ये 26, पनवेल महापालिका क्षेत्रात 13 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
आरोग्य मंत्र्यांनी बोलावली बैठक
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया उद्या, शुक्रवारी (7 एप्रिल) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीत विविध राज्यातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
दरम्यान, देशात 220.66 कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. पहिला डोस 102.74 कोटींहून अधिक लोकांना देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, सुमारे 95.20 कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्याच वेळी, 22.72 कोटींहून अधिक लोकांना प्रीकॉशन डोस देखील मिळाला आहे.