मुंबई : राज्यात आज 14,317 नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून आज 7 हजार 193 कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 57 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तसेच आतापर्यंत एकूण 21 लाख 06 हजार 400 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या एकूण 1 लाख 6 हजार 70 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.94 टक्क्यांवर आलं आहे.


राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनसंबंधी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 


पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 2840 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 15 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसतेय.


नांदेडमध्ये वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे 12 ते 21 मार्चपर्यंत अंशतः लॉकडाउन


नांदेड जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. नांदेड जिल्ह्यात 12 ते 21मार्चपर्यंत अंशतः लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये खाजगी कोचिंग क्लासेस, आठवडी बाजार, खाद्यगृह, परमिटरूम, धार्मिक, राजकीय, मंगल कार्यालय, लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रम पूर्णपणे बंद. मेडीकल वगळता सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री सात पर्यंतच सुरू राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांचे आदेश.


नागपुरात लॉकडाऊनची घोषणा
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी  15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून नये, असं आवाहनही नितीन राऊत यांनी केलं आहे. नागपूर मनपा हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी हे तीन भाग पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत आहेत, तेथेही लॉकडाऊन असणार आहे. 


काय सुरु राहणार?
नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत हे लॉकडाऊन लावले जाणार आहे. 15 ते 21 मार्च दरम्यान कडक संचारबंदी असणार आहे. नागपूर पोलिसांना कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं. या काळात उद्योग सुरू राहतील. सरकारी कार्यालय 25 टक्के उपस्थिती मध्ये सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा देखील सुरू राहतील. भाजी, दूध, दवाखाने, बँक, मीडिया या सेवा देखील सुरु राहतील. 


काय बंद राहणार?
लॉकडाऊन केलेल्या क्षेत्रातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहणार आहेत. दारूची दुकाने बंद राहतील. मात्र दारूची ऑनलाईल घरपोच सेवा सुरू राहणार आहे.