Maharashtra Coronavirus Update : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत असल्याचं दिसून येतंय. राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या आता 100 च्या वरती गेली आहे. आज राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 103 इतकी झाली आहे. राज्याप्रमाणे देशातही सक्रिय रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसतंय. 


राज्यातील कोव्हिड चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून त्यानंतर पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढल्याचं दिसून येतंय. आज राज्यात 35 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर एकही रुग्ण घरी परतला नाही. राज्यात आजपर्यंत एकूण 80,23,418 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.18 टक्के एवढे झाले आहे.


राज्यात आज एकही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.81 टक्के इतका आहे. 


देशात  पुन्हा एकदा कोरोना संक्रमण वाढताना दिसत असून यामुळे चिंता वाढली आहे. कोरोनाच्या नव्या JN1 सब-व्हेरियंटमुळे (Covid-19 JN.1 Variant) जगासह देशातही नव्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भारतातही कोरोनाच्या नवा सब-व्हेरियंट JN1 ने हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता आलेख पाहायला मिळत असून कोरोना रुग्णांची संख्या 2900 च्या पुढे गेली असून सहा कोरोनारुग्णांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.


नवीन JN.1 कोरोना व्हेरियंटने चिंता वाढवली


कोरोना JN.1 च्या नवीन व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. JN.1 व्हेरियंटमुळे कोविड रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं मानलं जातं आहे. नवीन JN.1 व्हेरियंट कोविड 19 विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंच आहे. JN.1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण 25 ऑगस्ट 2023 रोजी आढळला होता. केरळमध्ये कोरोनाचा नवीन सब-व्हेरियंट JN.1 चा रुग्ण आढळून आला. दरम्यान, देशाच्या इतर भागांमध्ये अद्याप या व्हेरियंटचा रुग्ण सापडलेला नाही, पण कोरोनाबाधितांची संख्या मात्र वाढली आहे.


हिवाळ्याच्या मोसमात श्वसनाच्या विषाणूंच्या प्रसारात वाढ झाल्यामुळे देखील सध्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. बहुतेक रुग्णांना सौम्य संसर्ग झाला आहे. सध्या, सुमारे 41 देशांमध्ये JN.1 व्हेरियंट आढळला आहे.


नवीन सब-व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये नोंदवलेली लक्षणे बहुतेक वरच्या श्वसनमार्गाच्या संसर्गापुरती मर्यादित आहेत आणि आतापर्यंत या रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे आढळून आलेली नाहीत.


ही बातमी वाचा :