नाशिक सध्या संपूर्ण देशभरात नववर्षाच्या (New Year) स्वागताची तयारी सुरु आहे. पण दुसरीकडे मागील काही वर्षांपासून धास्ती असलेल्या कोरोना (Covid 19) देखील त्याचं डोकं वर काढतोय. सध्या देशात JN1 व्हेरियंटमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर अयोध्येसह देशभरात आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांनी एबीपी माझाला दिली आहे. 


 देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट धुमाकूळ घालतोय.  केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र गोवा या राज्यांमध्ये प्रादुर्भाव वाढत असल्याने या राज्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र सध्या सुट्टीचे दिवस असल्याने नागरीक पर्यटनसाठी बाहेर पडत असल्याने खबरदारीच्या सूचना करण्यात आल्या.  ज्येष्ठ नागरिक, इतर व्याधींनी त्रस्त असणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे तसेच गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आलंय.


राज्यांना सतर्कतेचा इशारा


केरळमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्याची संख्या जास्त असल्याने तिथे जास्त प्रादुर्भाव वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना नियमांचे पालन करण्याबरोबरच  जिनोम सिक्वेन्सिंग केले जात असून चाचण्या वाढवण्यात आल्या होत्या.  22 तारखेला अयोध्येत राम मंदिरचे लोकार्पण केले जात असल्याने देशभरातील लाखो भाविकांची गर्दी रामजन्म भूमीत होणार असल्याने आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात असून सर्वच राज्यांना सतर्क करण्यात आले आहे.  देशात सध्या दिवसाला 200 ते 250 कोरोना रुग्ण आढळून येत असून 3 हजार 500 रुग्णांवर देशभरात उपचार सुरू आहेत. तर 16 रुग्णांचा मृत्यू झालाय. 


नवीन JN.1 कोरोना व्हेरियंटने चिंता वाढवली


कोरोना JN.1 च्या नवीन व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. JN.1 व्हेरियंटमुळे कोविड रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं मानलं जातं आहे. नवीन JN.1 व्हेरियंट कोविड 19 विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंच आहे. JN.1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण 25 ऑगस्ट 2023 रोजी आढळला होता. केरळमध्ये कोरोनाचा नवीन सब-व्हेरियंट JN.1 चा रुग्ण आढळून आला. दरम्यान, देशाच्या इतर भागांमध्ये अद्याप या व्हेरियंटचा रुग्ण सापडलेला नाही, पण कोरोनाबाधितांची संख्या मात्र वाढली आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता आलेख पाहायला मिळत असून कोरोना रुग्णांची संख्या 2900 च्या पुढे गेली असून सहा कोरोनारुग्णांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. 


हे ही वाचा :


Tanaji Sawant : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क, JN1 चाचण्या वाढविण्याचे तानाजी सावंतांचे निर्देश