मुंबई: उत्तर भारतात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना राज्यातही रुग्णसंख्या वाढणार का? कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता कितपत आहे? असे प्रश्न नागरिकांना पडले असताना तज्ज्ञांनी त्यावर काही दिलासादायक उत्तरं दिली आहेत. आपल्याला कोरोना व्हायरस सोबत जगावं लागेल, आपलं दैनंदिनी काम करावं लागेल, त्यामुळे कुठेही घाबरून जायचं किंवा किंवा पॅनिक व्हायचं कारण नाही असं मत राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केलं आहे. बंदिस्त ठिकाणी जात असाल तर मास्क घालाच असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 


काय म्हणालेत डॉ. राहुल पंडित? 
आता आपल्याला कळून चुकलं आहे की कोरोना कुठेही गेलेला नाही. चौथी लाट येईल, येणार नाही.., रुग्ण संख्या वाढेल, कमी होईल.., ते काही जरी झालं तरी आपण काही नियम पाळले तर आपल्या जीवनात काही अडथळा येणार नाही. 


उत्तर भारतात कोरोना रुग्णसंख्या वाढती याचं नेमकं कारण काय?
कोरोनाची ही सायकल आहे. दर तीन-चार महिन्यानंतर या कोरोना केसेस कमी-जास्त होत राहतात. दुसरं कारण म्हणजे कोरोना रुग्ण संख्या कमी झाली की आपण फारसे नियम पाळत नाही. लसीकरण सुद्धा कमी प्रमाणात होतं. आता मास्क सुद्धा ऐच्छिक केले आहे.


येत्या काही दिवसात मुंबईत महाराष्ट्रामध्येसुद्धा कोरोना रुग्ण संख्या वाढू शकते?
हे सांगणं कठीण आहे. पण आपण योग्य खबरदारी घेतली तर केसेस जास्त काही वाढणार नाहीत. 


मास्क आणि जिनोम सिक्वेसिंग किती महत्वाची?
हे दोन खऱ्या अर्थाने महत्त्वाचे पिलर आहेत. बऱ्यापैकी चांगला मेडिकल डेटा समोर आला आहे. बंदिस्त जागेमध्ये मास्क घालणे गरजेचे आहे. तिथे कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात होऊ शकतो. ओपन जागेसाठी त्या परिसरात फारशी गरज नाहीये. 


मॉल्स रुग्णालय सिनेमागृह नाट्यगृह अशा ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन आम्ही करू. जिनोम सिक्वेसिंग करणे सुद्धा महत्वाचे आहे. ज्याने आपल्याला नवीन स्ट्रेन आल्यास कळेल. त्याचा प्रादुर्भाव सुद्धा तातडीने कळेल आणि त्यानुसार उपाययोजना करता येतील, आणि तो सुरुवातीलाच कळणे गरजेचे आहे


मास्क ऐच्छिक केलेला राज्याचा निर्णय बदलला जाऊ शकतो का बंदिस्त ठिकाणी मास्क अनिवार्य होऊ शकतो का?
हा पूर्णपणे राज्य सरकारचा निर्णय असेल. मात्र मास्क सक्ती पुन्हा होणार का?  या पेक्षा एक चांगली सवय म्हणून तुम्ही जर बंदिस्त जागी जात असाल तर मास्क वापरा आणि आपल्या सोबत स्वतःच्या सहकाऱ्यांचा सुद्धा कोरोनापासून बचाव करा.