मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगलीसह अनेक ठिकाण कोरोना लसीचा एकही डोस शिल्लक नाही. त्यामुळे लसीकरण पूर्णपणे थांबलं आहे. तर कोल्हापुरातील लसीकरण आज दिवसभरात कधीही ठप्प होऊ शकतं. तर दुसरीकडे विदर्भातील अमरावती, वर्धा, बुलढाणा, गोंदियात सुद्धा लसीचा तुटवडा जाणवतोय. गोंदियातील लसीकरण सुद्धा बंद आहे. इतर जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला कोरोना लसीचा साठा उपलब्ध झाला नाही तर लसीकरण मोहीम अडचणीत येऊ शकते.  महाराष्ट्रात केवळ तीन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असून केंद्राने लवकरात लवकर लस पुरवावी अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. या दाव्यावरुन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.  


दरम्यान राज्यात लसींचा साठा आणि लसीकरणाची नेमकी स्थिती काय आहे जाणून घेऊयात...


... तर मुंबईतली सगळी लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की
मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक पेशंट आहेत आणि लसीकरण आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. उद्या जर तातडीनं मुंबईला लस पुरवठा झाला नाही तर मुंबईतली सगळी लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातलाच नाहीतर देशभरातला कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतच लसीकरण ठप्प होणार आहे.एक दिवसात मुंबईला लस मिळाली नाही तर परवा संपूर्ण मुंबईतील लसीकरण ठप्प होणार आहे. उद्या सर्व खाजगी सेंटर तर परवा सर्व शासकीय केंद्र सुद्धा लस पुरवठ्याअभावी बंद होणार आहे. आज मुंबईतील 50% लसीकरण केंद्र लस पुरवठ्याअभावी बंद आहेत. उद्या सर्व खाजगी लसीकरण केंद्र बंद होतील तर परवापर्यंत संपूर्ण मुंबईतील लसीकरण ठप्प होईल.आज मुंबईतल्या 120 सेंटरपैकी 26 खाजगी लसीकरण केंद्र बंद झाली तर, 24 केंद्र आज संधयाकाळपर्यंत बंद होतील. मुंबईत एकूण 120 सेंटर आहेत त्यांपैकी 73 खाजगी सेंटर आहेत. 


नवी मुंबई , पनवेलमध्ये डोस संपल्याने लसीकरण केंद्र बंद


नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगर पालिका क्षेत्रातीस लसींचा डोस संपल्याने लसीकरण बंद करण्याची वेळ दोन्ही शहरांवर आली आहे. नवी मुंबई मध्ये दिवसाला 8 हजारपर्यंत लसीकरण केले जाते. आतापर्यंत 1 लाख 42 हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत. शहरात 41 ठिकाणी लसीकरण केंद्र असून लस उपलब्ध नसल्याने केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. सद्या फक्त 4 हजार लसींचे डोस शिल्लक होते. आज रात्रीपर्यंत हाही संपणार असल्याने संपूर्ण शहरातील लसीकरण बंद होणार आहे. दुसरीकडे पनवेल महानगर पालिकेकडेही लस उपलब्ध नसल्याने पनवेलमधील लसीकरण बंद पडले आहेत.


Maharashtra Corona Vaccine Row | लस वाटपात उत्तर प्रदेश, गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राबाबत दुजाभाव का? : राजेश टोपे


चंद्रपूर जिल्ह्यात 31 लसीकरण केंद्रांवर लसीकरण ठप्प


चंद्रपूर : जिल्ह्यात 31 लसीकरण केंद्रांवर लसीकरण ठप्प, कोवीशिल्ड व कोवॅक्सिन लसींचा साठा संपल्याने लसीकरण बंद, 96 पैकी 65 केंद्रांवर अजून लसीकरण सुरू तर 31 ठिकाणी बंद, जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रांवर लागले लसीकरण बंदचे फलक, लवकरच लसींचा साठा येईल अशी जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती, आतापर्यंत दीड लाख लोकांचं लसीकरण


कोणत्या जिल्ह्यात किती डोस शिल्लक?


उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात 16790 डोस शिल्लक आहेत. रविवारपर्यंत अडचण नाही.
जालना : जालना आणखी 6 दिवस पुरेल एवढे डोस शिल्लक आहेत, दिवसाला 3700 डोस दिले जातात.
बीड : प्रत्येक दिवसाला 3000 लोकांना लस दिली जात होती. आता 9000 लोकांना दिवसाआड लस दिली जाईल. 14 हजार डोस शिल्लक आहेत. 3 ते 4 दिवसाचा साठा. 
परभणी : जिल्ह्यात आतपर्यंत 83 हजार 284 नागरिकांचे लसीकरण पुर्ण झालेले आहे. सध्या 14000 डोस शिल्लक आहेत त्यामुळे पुढचे 3 दिवस तरी काही अडचण नाही
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात 1 लाख 95 हजार 570 लसीकरण झालं. आतापर्यंत 20 हजार लसी शिल्लक आहेत. आणखी 3 दिवस साठा शिल्लक आहे.


रत्नागिरीतही लसीचा तुटवडा; दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक


रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या पहिल्या लसीची मात्रा संपली आहे. आताच्या घडीला केवळ दुसऱ्या वेळेची लस दिली जात आहे. असे असताना देखील जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापुरकर यांनी दोन दिवस पुरेल इतके डोस उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. यावेळी नेमके किती डोस आहेत? त्याचे आकडे सांगाल का? असा प्रेश्न विचारल्यानंतर मात्र लसीकरण सुरु आहे. मी एका कार्यक्रमात आहे असे उत्तर देत आकडा सांगण्यास टाळाटाळ केली आहे. 



सिंधुदुर्गातील लसीकरणही बंद होण्याच्या मार्गावर


सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 61,600 डोस उपलब्ध झाले होते. जिल्ह्यात आतापर्यंत 61 हजार 058 दोन्ही डोस दिले, त्यापैकी आज अखेर 542 डोस उपलब्ध आहेत. 53 हजार 078 जणांना पहिला डोस देण्यात आला. तर 7 हजार 980 जणांनाच दुसरा डोस देता आला. जिल्ह्यात लसीचा नव्या साठ्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे. जिल्ह्यात 38 प्राथमिक आरोग्य केंद, 11 जिल्हा रुग्णालयाअंतर्गत येणारी रुग्णालये, 7 खासगी रुग्णालयात लसीकरण केलं जात आहे. मात्र आज डोस उपलब्ध झाले नाहीत तर पुढील लस मिळेपर्यंत लसीकरण बंद राहणार आहे.


चंद्रपुरात 4800 लसीचे डोस शिल्लक 


चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 48 हजार 914 लोकांचं लसीकरण झालं आहे. जिल्ह्यात आज रोजी 4800 लसीचे डोस शिल्लक आहेत. जिल्ह्यात दररोज 8 हजार लोकांचं लसीकरण शक्य आहे. जिल्ह्यात 96 लसीकरण केंद्रे असून आज पुरेल इतक्याच लसीचे डोस शिल्लक आहेत, काही ठिकाणी लसीकरण लसीअभावी बंद देखील पडू शकतं.


कोल्हापूरमध्ये लसीचा तुटवडा, अडचणीत भर


कोल्हापूर जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने अडचणीत भर पडली आहे. जिल्ह्यात दररोज 35 हजार डोस लागतात, आता केवळ 19 हजार डोस शिल्लक आहेत. त्यामुळे आज दिवसभरात कोल्हापुरातील लसीकरण कधीही थांबू शकतं. लस संपल्याने महापालिकेने 9 लसीकरण केंद्रे बंद ठेवली. डोस शिल्लक असतील तेवढ्याच नागरिकांना बोलवून लस दिली जाणार आहे. 
 
साताऱ्यातही लसीकरण थांबलं


सातारा जिल्ह्यातील कोरोना लसीचा एकही डोस शिल्लक नाही. एका आठवड्यात 90 हजार 142 जणांना लस देण्यात आली. सध्या किमान 27 ते 30 हजार जणांचं लसीकरण केलं जात होतं.
 
एकही डोस नसल्याने सांगलीतील लसीकरण बंद
 
सांगली जिल्ह्यातील संपूर्ण लसीकरण काल संध्याकाळपासून बंद आहे. कालपर्यंत एकूण 2 लाख 60 हजार लोकांचे लसीकरण झाले. सध्याच्या घडीला लसीचा एकही डोस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद झालं आहे. नवीन लसीचा साठा आज किंवा उद्या मिळेल असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
 
गोंदियातील लसीकरण कालपासून बंद


गोंदिया जिल्ह्यातील लसीकरण कालपासून बंद आहे. लस संपल्याने आतापर्यंत 1 लाख 8 हजार लोकांना लस देण्यात आली असून 3 लाख जणांना लस देण्याचं उद्दिष्ट होतं. चार दिवसात लस उपलब्ध होईल, अशी माहिती समजते.
 
अमरावतीमध्ये तीन दिवस पुरतील एवढेच कोरोना लसीचे डोस


राज्यात लसीचा तुटवडा असल्याने आज लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी लोकांची गर्दी होऊ शकते. अमरावतीत तीन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक आहे. याचा परिणाम म्हणजे तीन दिवस पुरणारा साठा एका दिवसावर येऊ शकते.
 
यवतमाळमध्ये कोरोना लसीचे 16 हजार 720 डोस शिल्लक


यवतमाळ जिल्ह्यात कोरोना लसीचे 16 हजार 720 डोस शिल्लक आहेत. दररोज साधारण 8 हजार लसीची गरज असते. पुढील दोन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. जिल्ह्याची लोकसंख्या 29 लाख असून त्यात 45 वर्षांवरील नागरिक साधारण 9 लाख असतील, तेवढ्याच लसीची मागणी करण्यात आली आहे.
 
वर्ध्यात पाच दिवसांचा साठा शिल्लक


वर्धा जिल्ह्यात सर्व केंद्रांवर लसीकरण सुरु आहे. कोरोना लसीचे 40 हजार डोस शिल्लक असून पाच दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक आहे. सध्या एक लाख लसींची मागणी केली आहे.