Maharashtra Corona Updates: जगातील कोरोनाच्या (Corona Cases Update) उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन पंचसुत्रीचे काटेकोर पालन होईल, हे पाहण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज दिले. 


राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रुग्ण वाढताना दिसत आहेत. चीनमध्ये कोविड विषाणूचा बीएफ.7 हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा यावेळी घेण्यात आला.


राज्यात सध्या 2216 कोविड रुग्णालये, 1 लाख 34 हजार विलगीकरण खाटा


आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे यांनी कोविड परिस्थितीबाबत सादरीकरण केले.  राज्यात सध्या 2216 कोविड रुग्णालये असून 1 लाख 34 हजार विलगीकरण खाटा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. चाचण्या, ट्रॅकींग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसुत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसुत्रीची अमंलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 


कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा महाराष्ट्रात रुग्ण नाही


जगातील चीनसह अन्य देशांत कोरोना विषाणूचा बीएफ 7 हा नवा प्रकार आढळून आला आहे. या प्रकाराचा महाराष्ट्रात एकही रुग्ण आढळून आलेला  नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, दक्षता म्हणून मास्कचा वापर करीत गर्दीत जाताना सुरक्षित अंतर ठेवावे, असे निवेदन राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत केले. मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या संसर्गाची तीव्रता ओमीक्रॉनपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी आज दुपारी आढावा बैठक घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. तसेच कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर चाचणी, पाठपुरावा, उपचार आणि लसीकरणावर भर देण्यात येईल. आरोग्य यंत्रणांनाही सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत 95 टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तसेच येत्या सोमवारपासून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना नुसार आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची ताप चाचणी करण्यात येईल.


ही बातमी देखील वाचा


Maharashtra Corona Update : राज्यात आज 20 नवीन कोरोना रूग्णांची नोंद; चीनमधील रूग्णवाढीमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क