Mukta Tilak : भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या (Mukta tilak) माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. मागील काही महिन्यापासून सुरु असलेली कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. अखेर आज (22 डिसेंबर) त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.
बाळ गंगाधर टिळकांच्या पणतसून
टिळकांचा वारसा असलेल्या घरातील सून म्हणून त्यांनी राजारणात प्रवेश घेतला होता. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू जयंतराव टिळक यांच्या सूनबाई आहेत. म्हणजेच बाळ गंगाधर टिळकांच्या त्या पणतसून आहेत.
कॉंग्रेस मनसेला मागे टाकत कसब्यातून विजय
2019 मध्ये सध्याचे भाजप खासदार गिरीष बापट यांनी मुक्ता टिळक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे आणि मनसेचे अजय शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना मागे टाकत मुक्ता टिळकांनी कसब्यातून विजय मिळवला होता.
नगरसेविका, महापौर ते आमदार
1992 पासून मुक्ता टिळक साडेसतरा वर्ष कसबा भागातून भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यानंतर अडीच वर्ष त्या पुण्याच्या महापौर होत्या. त्या भाजपच्या पहिल्या महापौर असल्याचं सांगण्यात येतं. महापौर असताना त्यांनी पुण्याच्या अनेक समस्यांवर काम केलं.
आमदार झाल्या अन् कर्करोगानं ग्रासलं
2019 मध्ये त्या आमदार झाल्या. त्यानंतर अनेकदा त्यांनी राजकारणासोबतच सामाजिक कार्यदेखील केलं. हे करत असताना त्यांना कर्करोगानं ग्रासलं. त्यानंतर मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. कर्करोगाशी झुंज देत असतानादेखील त्यांनी मतदार संघातील नागरिकांचे प्रश्न सोडवले. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र आज अखेर त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली.
रुग्णवाहिकेतून मुंबई गाठली अन् मतदान केलं
विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यावेळी एका एका आमदाराच्या मताची भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी गरज होती. भाजप नेते मात्र पक्षाशी प्रामाणिक राहतात आणि पक्षाचे आदेश पाळतात हे त्यांनी या निवडणुकीच्या वेळी दाखवून दिलं होतं. शिवाय लढवय्या आमदार असल्याचंही त्यांच्या कृतीतून सगळ्या महाराष्ट्राला कळलं होतं. विधान परिषदेच्या निवडुकीच्यावेळी त्यांनी पुण्याहून रुग्णवाहिकेने मुंबईत जात मतदानाचा हक्क बजावला होता. त्यावेळी त्यांच्या हिंमतीची अनेक पक्षश्रेष्ठींनी दाद दिली होती.
रुग्णवाहिकेने पुणे टू मुंबई खास मतदानासाठी प्रवास
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी त्या पुण्याहून मुंबईला रुग्णवाहिकेने गेल्या होत्या. विधीमंडळ परिसरात दाखल झाल्यानंतर व्हिलचेअरवर बसून त्यांनी मतदान केलं होतं. त्या दरम्यान काही दूर त्यांंना वॉकरच्या साहय्याने चालावं लागलं. त्यावेळी त्यांना धाप लागल्याचं दिसत होतं. त्याचे फोटो आणि व्हिडीओदेखील प्रसारमाध्यमांमध्ये दाखवण्यात आले होते. राज्यसभेची जागा जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विजय मुक्ता टिळकांना समर्पित केला होता. त्यांच्या कार्याचं कौतुकही केलं होतं.