मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख सातत्याने वाढताना दिसत असून त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. आज राज्यात एकूण 4024 रुग्णांची भर पडली आहे तर 3028 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
राज्यामध्ये आज दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृत्यूदर 1.86 टक्के इतका झाला आहे. तर राज्यामध्ये आजपर्यंत एकूण 77,52,304 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.89 टक्के इतकं झालं आहे. राज्यामध्ये एकूण 19,261 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी मुंबईत 12,341 रुग्ण तर ठाण्यात 3611 आणि पुण्यात 1344 रुग्ण सापडले आहेत.
राज्यात बीए 5 व्हेरिएंटचे आणखी चार रुग्ण
राज्यात आज ओमायक्रॉनच्या बीए 5 व्हेरिएंटच्या चार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हे रुग्ण मुंबई, ठाण, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणचे आहेत. हे सर्व रुग्ण 19 ते 36 या वयोगटातील असून सर्वजण महिला आहेत.
मुंबईतील स्थिती
मुंबईत बुधवारी 2293 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली तर 1764 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 53 हजार 965 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 576 झाली आहे. सध्या मुंबईत 12 हजार 341 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 2293 रुग्णांमध्ये 2209 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 438 दिवसांवर गेला आहे.
नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ, जंबो सेंटर पुन्हा सुरू
गेल्या काही दिवसात मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. याचा परिणाम नवी मुंबईतही जाणवू लागला असून दिवसाला 250 ते 300 कोरोना रूग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे गेल्या 10 दिवसात नवी मुंबईत जवळपास तीन हजार कोरोना रूग्णांची भर पडली आहे. कोरोनाची वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता महानगरपालिकेकडून सिडको एग्झिबिशनमधील जंबो कोरोना सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. कोरोना लक्षणे आढळून आलेल्या रूग्णांचे घरातच विलगीकरण होत नसेल तर त्यांना या कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवले जात आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी टेस्टिंग संख्या वाढविण्यात आली आहे. ज्या सोसायटी मध्ये कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत तेथील सर्व रहिवाशांची कोरोना टेस्ट केली जात आहे. त्याच बरोबर 60 वर्षावरील वयोवृध्दांना बुस्टर ठोस आणि 15 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना दुसरा डोस देण्यावर मनपाच्या आरोग्य विभागाने भर दिला आहे.