Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाचे आगमन झाले. मात्र अद्यापही अनेक भागात पावसाची प्रतीक्षा असून जिल्ह्यातील धरणसाठ्यात घट पाहायला मिळत आहे. तर पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणी लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे. 


विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाला तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस वाढल्याशिवाय धरणाची पातळी वाढण्यास सुरुवात होत नाही. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांची पातळीही तळाला पोहोचली असून गंगापूर धरण 29 तर गिरणा धरणातील पाणी 37 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीचिंता वाढली आहे.


दरम्यान जिल्ह्यातील माणिकपुंज, नागासाक्या, केळझर, भोजापूर, भावली, वाघाड या धरणात शून्य ते पाच टक्यांपर्यंत जलसाठा आहे. तिकडे गंगापूर धरणात 29 टक्के, तर कश्यपीमध्ये 17 टक्के जलसाठा आहे. गौतमी गोदावरी 31 टक्के जलसाठा आहे तर आळंदी प्रकल्पात अवघा तीन टक्के जलसाठा शिल्लक आहे.


तिकडे पालखेड धरण समूहातदेखील पाण्याची वानवा जूनच्या अखेरीत बघायला मिळत असून पालखेड धरण सोडले तर करंजवन आणि वाघाडने तळ गाठलेले आहे. करंजवनमध्ये 15 टक्के जलसाठा सद्यस्थितीत आहे. तर वाघाडमध्ये पाच टक्के जलसाठा आहे. ओझरखेड, पुणेगाव आणि तिसगाव या तीनही धरणांत अनुक्रमे, 27 टक्के, 12 टक्के आणि शून्य टक्के असा जलसाठा आहे. दारणा, भावली, मुकणे, वालदेवी, कडवा आणि नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पांत मुकणे धरण वगळता इतर धरणांत जलसाठा खालावला आहे. यात दारणा धरणात 19 टक्के, भावलीत दोन, वालदेवी दहा तर कडवामध्ये 15 टक्के जलसाठा आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात 95 टक्के जलसाठा आहे.


तसेच गिरणा खोरे धरण समूहातील चणकापूर, हरणबारी केळझर नागसाक्या व गिरणा धरणातदेखील जलसाठा कमी झाला आहे. चणकापूरमध्ये 35 टक्के, हरणबारीत 20, केळझरमध्ये चार टक्के तर नागसाक्या कोरडेठाक पडले आहे. मालेगाव, नांदगावसह उत्त्तर महाराष्ट्राची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणात 37 टक्के जलसाठा असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर मध्यम प्रकल्प असलेल्या पुनद धरणात 18 टक्के जलसाठा आहे. तर माणिकपुंज कोरडेठाक पडले असून मनमाडवासियांचा पाणीप्रश्न अतिबिकट होण्याची शक्यता आहे.


जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचे आगमन झालेले आहे. मात्र, अद्याप अनेक भागांतील शेतकरी पावसासाठी आकाशाकडे नजरा लावून बसले आहेत. नाशिकवर पाणी कपातीचे अजून संकट नसले तरीदेखील आता नाशिककरांना पावसाची आस लागली आहे. जिल्ह्यातील विविध धरणांतील जलसाठा कमी झालेला आहे.