Maharashtra Corona Update : गेल्या आठवड्यात कमी झालेली कोरोनाची रूग्णसंख्या आता पुन्हा एकदा वाढली आहे. आज राज्यात 755 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी गेल्या आठवड्यात कमी झालेल्या संख्येत आता पुन्हा वाढ होत आहे. बुधवारी राज्यात 881 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. परंतु, त्याआधी म्हणजे सोमवारी राज्यात फक्त 414 नव्या रूग्णांची नोंद झाली होती. रूग्ण संख्येत वाढ होत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे नव्या रूग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रूग्णांची आज संख्या जास्त आहे.  


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 1,165 रुग्ण बरे होऊन घरी परतले  आहेत. राज्यात आजपर्यंत 79,60,298 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.11 टक्केएवढे झाले आहे.


चार बाधितांचा मृत्यू 
बुधवारी राज्यात पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. त्यात घट होऊन आज राज्यात चार करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.


सक्रिय रुग्ण
राज्यात सध्या 5012  रूग्ण ॲक्टिव्ह आहेत. यात सर्वाधिक सक्रिय रूग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईत सध्या 1309 रूग्ण सक्रिय रूग्ण आहेत. मुंबई पाठोपाठ पुण्यात 1183 तर ठाण्यात 962 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. 


देशातील स्थिती 
देशातील कोरोना रूग्णांचा आलेख देखील पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत नोंद झालेल्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या सहा हजारांच्या पलिकडे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात बुधवारी दिवसभरात 6 हजार 422 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. देशात मंगळवारी दिवसभरात 5 हजार 108 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बुधवारी रुग्णसंख्येत 1 हजार 314 रुग्णांची वाढ झाली आहे. 


देशात5 लाख 28 हजार 250 रुग्णांचा मृत्यू


भारतात बुधवारी दिवसभरात 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना महामारी पसरण्यास सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण 5 लाख 28 हजार 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.